ऑक्टोबरमध्ये थिएटर्सला गडगडवणाऱ्या या ब्लॉकबस्टरने 43 दिवसांत 849 कोटींची कमाई केली; आता प्राइम व्हिडीओवर कन्नडसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये उपलब्ध
2025 मध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली, पण यापैकी एक चित्रपट सर्वांच्या खास चर्चेत होता ‘कांतारा : चॅप्टर 1’. ऑक्टोबरमध्ये थिएटर्समध्ये दाखल झालेल्या या दाक्षिणात्य चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले. याच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत हा प्रीक्वेल 27 नोव्हेंबर 2025 पासून अमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दाक्षिणात्य व्हर्जन उपलब्ध झाले होते, मात्र अनेकांना हिंदी आवृत्तीची उत्सुकता होती. आता हा चित्रपट हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या सर्व भाषांमध्ये पाहता येणार आहे. ऋषभ शेट्टीसोबत गुलशन देवैया आणि रुक्मिणी वसंत यांच्या दमदार भूमिका चित्रपटाची शोभा वाढवतात.
2022 मध्ये आलेल्या ‘कांतारा’चा हा प्रीक्वेल आहे. यात पंर्जुली देवतेच्या उत्पत्तीची कथा, जंगलांचे संरक्षण, मानवी लोभ आणि दैवी शक्ती यांच्यातील संघर्ष अत्यंत जादुई पद्धतीने दाखवण्यात आला आहे. भूत कोला परंपरेचे प्रभावी चित्रणही हे चित्रपटाचे मोठे आकर्षण ठरते.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘कांतारा : चॅप्टर 1’ने केवळ 43 दिवसांत भारतात 738.40 कोटींची तर परदेशात 111 कोटींची भव्य कमाई केली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर्सपैकी एक बनला आहे.




