लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना कंगना राणौत यांचा भावनिक खुलासा
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक अतिशय वैयक्तिक आणि भावनिक अनुभव शेअर केला आहे. कंगना यांनी पहिल्या मासिक पाळीच्या काळातील आठवणी सांगताना लहानपणी मनात निर्माण झालेली भीती आणि संभ्रम उघड केला आहे.
कंगना सांगतात की, त्यांच्या बहुतेक मैत्रिणींना सहावी ते नववी दरम्यान मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र नववीत असूनही त्यांना पाळी आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आईला कायम काळजी वाटायची. कंगना बाहुल्यांमध्ये रमून खेळत असल्यामुळेच तिला मासिक पाळी येत नाही, असं आईला वाटायचं. याच कारणावरून एकदा रागाच्या भरात आईने तिच्या बाहुल्याही फेकून दिल्या होत्या.
आई कंगनाला सतत सांगायची की एक दिवस अचानक रक्तस्राव होईल आणि तेव्हा माझ्याकडे ये. अखेर तो दिवस आला. सकाळी उठल्यावर संपूर्ण बेडशीट रक्ताने भरलेली पाहून कंगना घाबरल्या. आई मात्र आनंदी झाली आणि तिने कंगनाला मिठी मारली. पण त्या क्षणी कंगनाच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. “आता बाबा माझ्यावर प्रेम करणार नाहीत”, “मी वडिलांच्या जवळ बसू शकणार नाही” अशी भावना त्यांच्या मनात घर करून बसली होती.
सध्या कंगना राणौत चित्रपटांपेक्षा राजकारणात अधिक सक्रिय आहेत. बॉलिवूडमधील अनेक वाद, थेट वक्तव्ये आणि राजकीय भूमिकांमुळे त्या सतत चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी शेअर केलेला हा अनुभव अनेक महिलांच्या भावनांशी जोडणारा ठरतो आहे.




