‘नीचा नगर’पासून सात दशकांच्या चमकदार कारकिर्दीपर्यंत अभिनेत्रीच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा
हिंदी चित्रपटसृष्टीतून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेत्री कामिनी कौशल (Kamini Kaushal) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे. 1940 ते 1960 या सुवर्णकाळात त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमधील सर्वांत वयस्कर आणि अनुभवी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
कामिनी कौशल यांचा जन्म लाहोरमधील एका सुशिक्षित कुटुंबात उमा कश्यप (Uma Kashyap) या नावाने झाला होता. बालपणापासूनच त्यांना घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे आणि हस्तकलेचा छंद होता. अभिनयाची आवड लक्षात घेऊन त्यांनी रेडिओ नाटकं आणि स्टेजवरही काम केलं व नंतर चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला.
1946 मध्ये ‘नीचा नगर’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा ‘पाम डी’ओर’ पुरस्कार मिळवणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला. याच चित्रपटाने कामिनी कौशल यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख दिली.
1946 ते 1963 दरम्यान त्यांनी ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदियाँ के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘आरजू’, ‘नमूना’, ‘जेलर’, ‘नाईट क्लब’ अशा अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या. अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबतची त्यांची ऑनस्क्रीन जोडी विशेष लोकप्रिय ठरली. त्यांच्यातील जवळीकीच्या चर्चाही त्या काळात रंगल्या. मात्र, बहिणीच्या निधनानंतर भावोजी बी. एस. सूद यांच्याशी विवाह करून त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिलं.
सात दशकांच्या कारकिर्दीत कामिनी कौशल यांनी चित्रपट, नाटकं आणि नंतरच्या काळात टेलिव्हिजनवरही आपली छाप कायम ठेवली. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन केलं असून त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.




