कुत्रा चावल्याने मनात बसली होती भीती; सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली मनातील टोकाची अस्वस्थता.
कल्याणमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने केवळ ‘रेबीज’च्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयश विश्वनाथ अमीन (वय ३०) असे या तरुणाचे नाव असून, तो गेल्या ८ वर्षांपासून एका नामांकित सहकारी बँकेत कार्यरत होता. एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आपल्याला रेबीज होईल आणि त्याचा त्रास आपल्या वृद्ध आई-वडिलांना पहावा लागेल, या कल्पनेने त्याने स्वतःला संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आयशला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्याने लसीकरणाला सुरुवातही केली होती, परंतु त्याने केवळ एकच इंजेक्शन घेतले आणि उर्वरित डोस पूर्ण केले नाहीत. काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात असामान्य बदल जाणवू लागले होते. ‘मला रेबीजची लक्षणे दिसत आहेत’ या एकाच विचाराने त्याला नैराश्याने ग्रासले होते. सुसाईड नोटमधील भावूक खुलासा: रविवारी सायंकाळी जेव्हा घरात कोणीही नव्हते, तेव्हा आयशने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यात त्याने नमूद केले की “कुत्रा चावल्यामुळे मला रेबीज होण्याची भीती वाटत आहे. आजार बळावल्यानंतर होणारा माझा त्रास माझ्या वृद्ध आई-वडिलांना सहन होणार नाही, म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये.”
या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन सद्यस्थितीची दाहकता मांडली. केवळ कागदी अहवाल न पाहता प्रत्यक्ष मैदानात उतरून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




