महायुतीकडे बहुमत असतानाही भाजप–शिंदे गटात तणाव, मनसे व ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका अखेर पार पडल्या असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली. या निवडणुकांमध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे आता विविध महापालिकांमध्ये महापौर पद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येथे महायुतीकडे संख्याबळ असतानाही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 62 नगरसेवकांचे पाठबळ आवश्यक आहे. भाजपकडे 50 जागा असून शिवसेना शिंदे गटाकडे 53 जागा आहेत. त्यामुळे भाजपला आणखी 12, तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज भासते आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट, मनसे आणि इतर पक्षांतील नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे काही नगरसेवक गेम चेंजर ठरू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव ठाकरे गटाचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे.
कल्याण–डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाचे 11, मनसेचे 5, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा 1 असा एकूण 19 नगरसेवकांचा गट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांशी संपर्क साधला जात असून त्यापैकी काही जण पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भाजपने सध्या सावध आणि शांत भूमिका घेतल्याचे दिसून येते. याआधी एकनाथ शिंदे यांनी महायुती टिकवण्यासाठी अडीच-अडीच वर्षांचा महापौर पदाचा फॉर्म्युला सुचवला होता. आता भाजप पुन्हा हा पर्याय पुढे आणणार का, याबाबत उत्सुकता आहे. तसेच शिंदे गटाचा मान राखण्यासाठी भाजप ठाकरे गटाऐवजी मनसेसोबत हातमिळवणी करेल का, यावरही तर्कवितर्क सुरू आहेत.
एकूणच कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून पुढील काही दिवसांत सत्तास्थापनेबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.




