Kabaddi player Rana Balachauria Death : मोहालीत कबड्डी स्पर्धेदरम्यान गोळीबार; आयोजक राणा बलाचौरियांची हत्या

spot_img

बंबीहा गँगचा खळबळजनक दावा, सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला घेतल्याचं सोशल मीडियावर जाहीर

पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील सोहाना परिसरात झालेल्या एका थरारक घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बेदवान स्पोर्ट्स क्लबच्या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेदरम्यान सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केला. या हल्ल्यात स्पर्धेचे आयोजक आणि कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बलाचौरिया यांचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. राणा बलाचौरिया यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत एक कबड्डी खेळाडू गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हत्येची जबाबदारी कुख्यात बंबीहा गँगने स्वीकारली आहे. गँगचा सदस्य गोपी घनश्यामपुरिया याने सोशल मीडियावर पोस्ट करत, आपल्या साथीदारांसह राणा बलाचौरियाच्या हत्येची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलं. पोस्टमध्ये राणा बलाचौरियाने जग्गू खोती आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यासोबत गँगविरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा गंभीर दावा देखील करण्यात आला आहे.

“राणा बलाचौरियाला ठार मारून आम्ही आमचा भाऊ सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा बदला घेतला आहे,” असा खळबळजनक दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच, काही विशिष्ट गटांशी संबंधित संघात खेळणाऱ्या खेळाडूंना इशारा देत, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धमकीवजा संदेशही देण्यात आला आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये अलीकडच्या काळात कबड्डी खेळाडूंवर होणाऱ्या हल्ल्यांची संख्या वाढत आहे. केवळ 2025 या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत तीन कबड्डीपटूंची हत्या झाली असून, यामध्ये जूनमध्ये सोनू नोल्टा, ऑक्टोबरमध्ये तेजपाल सिंग आणि आता राणा बलाचौरिया यांचा समावेश आहे. या सततच्या घटनांमुळे खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या हत्यांसाठी आम आदमी पार्टी सरकारला जबाबदार धरलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ