spot_img

Junnar Leopard Attack : जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

spot_img

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

जुन्नर (Junnar) तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथे शेतात कांदा काढणीचे काम सुरू होते. शेताच्या बांधावर बसलेल्या एका आठ वर्षीय मुलावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. यात त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहित बाबू कापरे वय (8 वर्षे, रा.धामणसई, ता. रोहा, जि. रायगड ) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे.

सोमवारी दि. 15 सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीचे काम सुरू होते. कांदा काढणीसाठी आलेल्या मजुराचा मुलगा रोहित कापरे हा शेताच्या बांधावर बसला असताना,ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहितवर हल्ला करून, त्याला ओढत ऊसाच्या शेतात नेले. यावेळी महिला मजुरांनी आरडाओरडा करून, ऊसाच्या शेतात शिरून रोहितला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. त्याला पारगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु या हल्ल्यात रोहित हा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपरखेडला काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबेच्या या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनास्थळापासून अवघ्या दीड मीटरच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यावेळी घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आक्रोश केला होता. घटनास्थळी जोपर्यंत लोकप्रतिनीधी येत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही अशी ठाम भूमीका पारगाव ग्रामस्थांनी घेतली होती. घटनास्थळी जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे,सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस,ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यासाठी वनविभागाने दहा पिंजरे लावले असून,रात्री उशिरापर्यंत अधिक पिंजरे लावण्याचे काम सुरू होते. तसेच घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच थर्मल ड्रोनच्या साहायाने रात्रंदिवस सर्वे सुरू असून वनविभागाचे कर्मचारी पहारा देत आहेत. दरम्यान पिंपरखेड येथे याच परिसरात काही दिवसांपूर्वी रोहन बोंबे या शालेय विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पारगाव मंगरूळ येथील आजची घटना पिंपरखेडच्या या पूर्वीच्या घटनास्थळापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर घडली आहे.पिंपरखेड जवळील या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना घडली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ