जेमिमाच्या वडिलांवर झाले होते धर्मांतराचे आरोप
काळ हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. कितीही संकटं आली, मानसिक खच्चीकरण झालं तरी केवळ संयम आणि स्वतःवरील विश्वास तसूभरही ढळू न देता काळाशी लढत राहिलं कि, एके दिवशी यश तुमच्या पायाशी येते. जेमिमा रॉड्रिग्जनं (Jemima Rodriguez) हेच तत्व स्वीकारलं आणि गेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघातून वगळल्या गेलेल्या, गेले सहा महिने धार्मिकतेतून ट्रोल झालेल्या जेमिमानं भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian womens cricket team) विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिलं. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रिकेटची बॅट हातात घेऊन मैदानात उतरलेल्या जेमिमा आयव्हन रॉड्रिग्जचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच संघर्षपूर्ण आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षी आजोबांनी दिलेली प्लॅस्टिकची बॅट घेऊन भांडुपच्या गल्ल्यांमध्ये भावांसोबत क्रिकेट खेळणारी जेमी क्रिकेटशिवाय हॉकी, फुटबॉलदेखील चांगलं खेळत होती. महाराष्ट्राच्या संघातून हॉकीमध्ये ती राष्ट्रीय स्तरावर खेळून आली. 11 वर्षाची असताना क्रिकेट की हॉकी? हा प्रश्न जेव्हा वडिलांनी जेमीला विचारला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता जेमीनं उत्तर दिलं क्रिकेट. आणि जेमीचा व्यावसायिक क्रिकेटचा प्रवास सुरु झाला.तिला वांद्रेतील एमआयजी क्लबमध्ये दाखल केलं. कोच प्रशांत शेट्टी यांनाही जेमीमध्ये स्पार्क दिसला. रोजची लोकलची धकाधकी नको म्हणून जेमीसाठी रॉड्रिग्ज कुटुंब वांद्र्यातील शिफ्ट झालं.जेमीने खूप मेहनत करून वर्षभरातच म्हणजे 2012 साली मुंबईच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघात स्थान मिळवलं आणि मग जेमीचा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. 12 मार्च 2018 रोजी वडोदऱ्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जेमीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. त्याच वर्षी ती टी20 इंटरनॅशनल देखील खेळली. पण, कसोटी क्रिकेटची नैसर्गिक शैली असलेल्या जेमीला भारतीय कसोटी संघात डेब्यू करायला तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली. 2022 मध्ये झालेल्या विश्वषक स्पर्धेत जेमीला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. याचा प्रचंड मानसिक दबाव जेमीवर होता.
मैदानाबाहेरच्या वादामुळे गेल्या काही महिन्यांत जेमी प्रचंड तणावाखाली होती. डिसेंबर 2024 मध्ये जेमीच्या वडिलांनी खार जिमखान्याच्या जागेत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले इतकेच नाही तर त्यांनी धर्मांतरासाठी या जागेचा वापर केला, असा ठपका ठेवत जेमीचं खार जिमखान्याचं मानद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. खार जिमखान्याच्या तत्कालीन अध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळताना, क्लबमधील गटबाजी आणि निवडणुकीचे राजकारण यास कारणीभूत असल्याचे त्यावेळी सांगितले. मात्र, काही कडव्या उजव्यांनी जेमिमाच्या वडिलांवर वारंवार आरोप केले. काहींची पातळी तर तिच्यावर सामूहिक बलात्काराच्या धमक्या देण्यापर्यंत ढासळली. अनेकांनी कोणतीही शहानिशा न करता समाजमाध्यमांवर जेमिमा आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी सुरू ठेवली. तिच्या देश प्रेमावर शंका उपस्थित केल्या. त्या प्रकाराचा जेमिनाच्या मन:स्थितीवर परिणाम झाला होता. त्यातही संयम ढळू न देता जेमिमा शांत राहिली. आणि 30 ऑकटोबरला डी वाय पाटील मैदानावर ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत करत जेमीने आपल्या बॅटनेच तिच्या देश प्रेमावर शंका घेणाऱ्यांना खणखणीत उत्तर दिलं. मैदानावरच जेमीच्या अश्रूंचा बांध का फुटला, याचंही उत्तर मिळालं.




