पॅपाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन.
पॅपाराझींना झोडून काढणाऱ्या जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. पॅपाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन यांच्यावर त्यांच्या चिडचिडण्यामुळे नेटकऱ्यांनीही अनेकदा ट्रोलिंगची झोड उठवली होती. अशातच आता जया बच्चन यांनी आता पॅपाराझींवर भडकण्याचं कारण सांगितलं आहे. तसेच, पॅपाराझींवर बोलताना सडकून टिका केली आहे. एवढंच काय तर, जया बच्चन यांनी पॅपाराझींचा उल्लेख ‘उंदीर’, ‘घाणेरडी पँट घालणारे’ असा केला आहे. जया बच्चन यांनी बरखा दत्तच्या ‘वी द वुमन’ (We the Women) या शोमध्ये हजेरी लावली होती. आजवर आपण जया बच्चन यांना पॅपाराझींवर आगपाखड करताना पाहिलंय. पण, जया बच्चन यांचा पॅपाराझीसोबत एवढा छत्तीसचा आकडा का? पॅपाराझी दिसल्या दिसल्या त्यांचा रागाचा पारा एवढा का चढतो? असे अनेक प्रश्न पडतात. यावरच जया बच्चन यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
‘वी द वुमन’ शोमध्ये बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, “माझे माध्यमांशी खूप चांगले संबंध आहेत. मी मीडियाचेच प्रोडक्ट आहे, पण पॅपाराझींशी माझा अजिबात संबंध नाही… हे लोक कोण आहेत? ते या देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षित आहेत का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता? मी मीडियातूनच आलेय. माझे वडील पत्रकार होते. मला अशा लोकांबद्दल खूप आदर आहे…”
जया बच्चन यांनी पॅपाराझींच्या कपड्यांचाही उल्लेख केला. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या शिक्षणावरही प्रश्न उपस्थित केला. जया बच्चन म्हणाल्या की, “हे लोक घाणेरड्या ड्रेन पाईप पॅन्ट घालतात आणि मोबाईल फोन धरतात, मग त्यांना वाटतं की, ते तुमचा फोटो काढू शकतात आणि त्यांना जे हवे ते बोलू शकतात? याशिवाय ते ज्या कमेंट्स पास करतात? ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत? ते कुठून येतात? त्यांचं शिक्षण कोणत्या प्रकारचे आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? ते फक्त YouTube वर आहेत किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कवर आहेत म्हणून ते आमचे प्रतिनिधित्व करतील असं आहे का? मी कोणत्याही सोशल नेटवर्कवर नाही, त्यामुळे मला याबाबत माहीत नाही…”
“मी त्यांना ओळखत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहात, त्यांना मी ओळखतही नाही. माझा नातू (अगस्त्य बच्चन) देखील तरुण आहे, पण तो कोणत्याही सोशल मीडियावर नाही. जर तुम्हाला विमानतळावर लोकांना तुमचे फोटो काढण्यासाठी आमंत्रित करावं लागत असेल, तर तुम्ही कोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी आहात?”, असंही जया बच्चन म्हणाल्या.




