“माझ्या वडिलांना गमावलं, आता तरी न्याय द्या”; जय पवारांची DGCA कडे रोहित सिंह यांच्या अटकेची मागणी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटल्यानंतर आता या प्रकरणाला अत्यंत खळबळजनक वळण मिळाले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या त्या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या VSR कंपनीच्या विमानात हा अपघात झाला, त्या कंपनीचे मालक रोहित सिंह हे चक्क मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. उड्डाण सुरू असताना आणि विमान हजारो फूट उंचीवर असताना अशा प्रकारे मुख्य वैमानिकाने झोपणे, हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप जय पवार यांनी केला आहे.
या संतापजनक प्रकारामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली असून जय पवार यांनी थेट केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. “माझ्या वडिलांना आम्ही गमावले आहे, ही न भरून निघणारी जखम आयुष्यभर सोबत राहील. पण इतरांच्या बाबतीत असे घडू नये, म्हणून मी रोहित सिंह यांच्या तात्काळ अटकेची मागणी करत आहे,” अशा शब्दांत जय पवारांनी आपला आर्त टाहो फोडला आहे. तसेच, जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत VSR कंपनीची सर्व विमाने तात्काळ ‘ग्राउंड’ करण्यात यावीत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही यापूर्वीच कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणाला केवळ अपघात न मानता ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. आता जय पवारांनी पुराव्यासह केलेल्या या आरोपांनंतर सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही केवळ एका कुटुंबाची वेदना नसून प्रत्येक विमान प्रवाशाच्या सुरक्षिततेशी जोडलेला गंभीर प्रश्न बनला आहे.




