लग्नानंतर हनिमूनला निघालेल्या जयला मुंबई विमानतळावर अटक; सुमारे 5 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणे याला रविवारी मुंबई विमानतळावरून वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ठाण्यातील गहाण असलेली दुकानं विकण्याचा प्रयत्न करून सुमारे 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप जयवर आहे. विशेष म्हणजे अटकेच्या वेळी जय पत्नीसमवेत हनिमूनसाठी रवाना होत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक येथील गांधीनगर परिसरात जयच्या कुटुंबाची पाच दुकानं आहेत. मार्च 2024 मध्ये ही दुकानं विक्रीसाठी असल्याची माहिती एका सेवानिवृत्त शासकीय अभियंत्याला मिळाली. त्यांनी जय आणि त्याच्या वडिलांशी चर्चा करून दुकानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व्यवहाराची किंमत 4 कोटी 90 लाख रुपये ठरली होती.
मार्च ते मे 2024 या कालावधीत तक्रारदाराने जयच्या कुटुंबीयांना एकूण 3 कोटी 25 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले होते. या व्यवहाराची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीही करण्यात आली होती. मात्र, जून 2024 मध्ये जयच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर व्यवहाराबाबत जयकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
पाठपुरावा केल्यानंतर जयने संबंधित दुकानं एका बँकेकडे गहाण असल्याची कबुली दिली. व्यवहारानुसार तक्रारदाराने जवळपास 94 टक्के रक्कम आधीच दिली होती. पुढे बँकेचं कर्ज फेडलेलं नसून दुकानांवर जप्ती येण्याची शक्यता असल्याचंही जयने मान्य केल्याचं तक्रारीत नमूद आहे. जप्ती टाळण्यासाठी त्याने आणखी 55 लाख रुपयांची मागणी केली आणि कर्जमुक्तीची बनावट कागदपत्रं दाखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत जयला अटक केली. दरम्यान, जय दुधाणेने आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून, “मी कुठेही पळून गेलेलो नाही. सत्य लवकरच समोर येईल. हा खोटा गुन्हा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.




