98 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्पॅनिश अभिनेता जॅवियर बार्डेम यांनी मंचावरून युद्धाविरोधात ठाम भूमिका मांडत पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’चा पुरस्कार जाहीर करण्यासाठी ते मंचावर आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील उपस्थित होती.
मंचावर बोलताना बार्डेम यांनी स्पष्टपणे “युद्धाला नाही आणि फ्री पॅलेस्टाईन” असा संदेश दिला. त्यांनी आपल्या कोटवर “No to War” असा संदेश असलेला पिन लावून युद्धाविरोधातील भूमिका दर्शवली होती. रेड कार्पेटवर देखील त्यांनी युद्धाला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते.
बार्डेम यांनी ही भूमिका व्यक्त करताच सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे समर्थन केले. त्यानंतर जॅवियर बार्डेम आणि प्रियंका चोप्रा यांनी नॉर्वेच्या ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’चा पुरस्कार प्रदान केला.
दरम्यान, मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ऑस्कर सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोनन ओ’ब्रायन यांनीही आपल्या उद्घाटनपर भाषणात सध्याच्या जागतिक तणाव आणि अस्थिरतेचा उल्लेख केला.




