ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर जावेद अख्तरांची स्पष्ट भूमिका, इंडस्ट्री सांप्रदायिक झाल्याचा दावा फेटाळला
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या आठ वर्षांत बॉलिवूडमध्ये अपेक्षेप्रमाणे काम मिळालं नाही, असा अनुभव व्यक्त केला होता. फिल्म इंडस्ट्रीत सत्ताकेंद्रे बदलत असून त्यामुळे सर्जनशीलतेपेक्षा इतर घटक प्रभावी ठरत असल्याचं त्यांनी सूचकपणे नमूद केलं. यावरून इंडस्ट्री सांप्रदायिक होत चालल्याची चर्चाही रंगली.
मात्र, या मुद्द्यावर ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना अख्तर यांनी रेहमान यांच्या मताशी असहमती दर्शवली. रेहमान यांना इंडस्ट्रीत अपार सन्मान असल्याचं सांगत, त्यांच्या प्रतिभेची उंची इतकी मोठी आहे की अनेक जण त्यांच्यापर्यंत जाण्यासच संकोच करतात, असं ते म्हणाले. “रेहमान इतके मोठे आहेत की ते आपल्या आवाक्याबाहेरचे आहेत, अशी भीतीयुक्त भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळेच कदाचित त्यांच्याशी संपर्क साधला जात नाही,” असं अख्तर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत रेहमान यांनी स्वतःवर थेट भेदभाव झाल्याचा अनुभव नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, इंडस्ट्रीतील बदलणारी पॉवर स्ट्रक्चर्स आणि सर्जनशील नसलेल्या लोकांच्या हातात सत्ता जाणं, हे घटक कामाच्या संधींवर परिणाम करत असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आपण कामाच्या शोधात नसून, योग्य वेळी योग्य काम आपल्यापर्यंत येईल, असा विश्वासही रेहमान यांनी यावेळी बोलून दाखवला.




