गेल्या 12 महिन्यांत विकेट्सची घट, डेथ ओव्हर्समध्ये वाढलेली धावसंख्या आणि सलग मोठ्या ओव्हर्समुळे जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या अपेक्षांवर पूर्ण उतरताना दिसत नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजांची धावगती रोखणारा हा वेगवान गोलंदाज आता स्वतःच धावांचा मारा सहन करत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये बुमराहची पकड सैल झाल्याचं अलीकडील सामन्यांत स्पष्टपणे जाणवत आहे.
गेल्या दोन महिन्यांत चार वेळा बुमराहच्या एका ओव्हरमध्ये 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा निघाल्या आहेत. 28 जानेवारी रोजी वायजॅग येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात 19व्या ओव्हरमध्ये त्याने 19 धावा दिल्या. याच मालिकेतील पहिल्या सामन्यातही 18व्या ओव्हरमध्ये 15 धावा देत त्याला मोठा फटका बसला होता.
डिसेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही बुमराहसाठी परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. एका सामन्यात पावरप्लेमध्ये 16 धावा आणि डेथ ओव्हरमध्ये 17 धावा देत त्याला दुहेरी झटका बसला होता. यावरून बुमराह पावरप्ले असो वा डेथ ओव्हर्स – दोन्ही टप्प्यांत अपेक्षित प्रभाव पाडण्यात कमी पडतोय, असं चित्र उभं राहत आहे.
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, यामागे दुखापतीनंतरची अपूर्ण रिकव्हरी एक कारण असू शकते. बुमराहने कमबॅक नक्कीच केला आहे, मात्र आधी ज्या फलंदाजांसाठी तो ‘कोडं’ होता, ते आता त्याची लाईन-लेंथ आणि व्हेरिएशन सहज वाचू लागले आहेत. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळ वाढल्याचं दिसत आहे.
आकडेवारीही बुमराहच्या सध्याच्या संघर्षाची साक्ष देते. गेल्या 12 महिन्यांत त्याने 16 टी-20 सामने खेळून केवळ 18 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत एकदाही 4 किंवा 5 विकेट घेण्याची कामगिरी त्याला करता आलेली नाही. त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 17 धावांत 3 विकेट असं राहिलं आहे.
एकेकाळी ‘डेथ ओव्हर्सचा किंग’ म्हणून ओळखला जाणारा बुमराह पुन्हा त्या जुन्या लयीत परतेल का, हा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांच्या मनात घोळत आहे. आगामी सामन्यांत त्याची कामगिरी सुधारते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




