जालना (Jalna) महानगरपालिकेच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. एकूण 65 जागांपैकी तब्बल 42 जागांवर विजय मिळवत भाजपने महापालिकेचा गड सर केला. या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) 12, काँग्रेसला 8, एमआयएमला 2 तर एका अपक्षाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे, महायुतीचा भाग असूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) आणि मनसेची पाटी कोरीच राहिली. अशातच आरसीबीच्या माजी खेळाडूच्या पत्नीचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
खोतकर कुटुंबातील माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची कन्या दर्शना झोल विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 16 मधून त्या निवडून आल्या. दर्शना झोल या भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा माजी खेळाडू विजय झोल याच्या पत्नी आहे. 2012 मध्ये आशिया कप संपल्यानंतर, ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या 2012 आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपसाठी त्याला भारतीय टीमचा व्हाइस-कॅप्टन नियुक्त करण्यात आलं होतं. या वर्ल्ड कपमध्ये त्याने टीमसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली.




