आपण बाजारात जातो, ब्रँडेड वस्तू पाहतो आणि विश्वासाने त्या विकत घेतो. ‘अमूल’ सारख्या नावावर तर आपल्या सर्वांचा डोळे झाकून विश्वास असतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की, तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे केचअप, मेयोनेझ किंवा नूडल्स आणताय, ते कदाचित ‘विष’ असू शकतं? तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हो, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक असा धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे, ज्याने संपूर्ण देशाची झोप उडवली आहे. तब्बल 1,50,000 किलो एक्सपायरी झालेलं अन्नपदार्थ, ज्याच्या तारखा बदलून ते पुन्हा बाजारात विकण्याची तयारी सुरू होती!
हा सगळा प्रकार जयपूरमधील खो नागोरियन भागात घडला. या भागात ‘मेसर्स ॲथलीट डिस्ट्रिब्युटर्स’ नावाचं एक मोठं गोदाम आहे. वरवर पाहता हे एक सामान्य गोदाम वाटायचं, पण आतमध्ये जे सुरू होतं ते भयानक होतं. या घोटाळ्याचा पर्दाफाश एका सतर्क नागरिकामुळे झाला. त्या नागरिकाला संशय आला की, या गोदामात काहीतरी काळं-बेरं सुरू आहे. त्याने तात्काळ राजस्थान सरकारच्या 181 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवली. तक्रार अशी होती की, या गोदामात एक्सपायरी संपलेले अमूल ब्रँडचे पदार्थ साठवले जात आहेत आणि त्यांच्या तारखा बदलून ते स्वस्त दरात बाजारात विकले जात आहेत. ही तक्रार मिळताच प्रशासकीय यंत्रणा हलली. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव गायत्री राठोड यांनी तात्काळ आदेश दिले आणि जयपूरच्या मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने तिथे धाड टाकली.
जेव्हा तपास पथक गोदामात पोहोचलं, तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांचेही डोळे पांढरे झाले. एका अवाढव्य गोदामात अन्नाचे हजारो कार्टन्स साचलेले होते. यामध्ये प्रामुख्याने अमूल ब्रँडचे (Non-Dairy Products) होते. यात नूडल्स, टोमॅटो केचअप, मेयोनेझ आणि इतर अनेक सॉसेस. अन्न सुरक्षा विभागाच्या मते, तिथे सुमारे 12,000 कार्टन्स सापडले. यातील 3,000 कार्टन्स तर असे होते, ज्यांच्या पॅकेजिंगवरून मूळ एक्सपायरी डेट केमिकलच्या साहाय्याने पुसून टाकण्यात आली होती! अन्न सुरक्षा आणि औषध नियंत्रण विभागाचे अतिरिक्त आयुक्त भागवत सिंह यांनी सांगितलं की, मालाचं प्रमाण इतकं प्रचंड होतं की ते जप्त करून नष्ट करण्यासाठी तब्बल 4 दिवस लागले. हा कचरा नेण्यासाठी 27 ट्रक लागले, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा घोटाळा किती मोठा होता.
आता सर्वात धक्कादायक गोष्ट! जेव्हा या व्यापाऱ्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून अधिकारीही चक्रावून गेले. हा व्यापारी जुन्या तारखा कशा पुसायच्या आणि त्यावर नव्या तारखा कशा छापायच्या, हे चक्क यूट्यूबवरून शिकला होता! तंत्रज्ञानाचा वापर लोक प्रगतीसाठी करतात, पण इथे एका व्यक्तीने लोकांच्या जीवाशी खेळ करण्यासाठी त्याचा वापर केला. याची मोडस ऑपरेंडी समजून घेऊ. हा व्यापारी वेगवेगळ्या कंपन्यांकडून अशा वस्तू खरेदी करायचा, ज्यांची एक्सपायरी डेट संपत आली आहे किंवा संपली आहे. या वस्तू त्याला अगदी कवडीमोल दराने मिळायच्या. त्यानंतर गोदामात केमिकलचा वापर करून जुनी तारीख पुसली जायची. नवीन स्टॅम्प किंवा प्रिंटिंग मशीनने त्यावर पुढील 1-2 वर्षांची तारीख टाकली जायची. आणि मग हाच ‘विषारी’ माल बाजारात कमी किमतीत विकला जायचा.
आता प्रश्न निर्माण होतो की, इतक्या मोठ्या प्रमाणात हा माल आला कुठून? तपासात समोर आलं की, ही उत्पादने गुजरातमधील कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने तयार केली होती आणि ॲडव्हान्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ती पुरवली होती. या दोन्ही कंपन्यांना आता अन्न सुरक्षा विभागाने कडक नोटिसा बजावल्या आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 च्या विविध कलमांखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. टी. शुभमंगला यांनी स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत या फर्मच्या कामकाजावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोदामात 10-12 कर्मचारी काम करायचे. सकाळी एकदा कर्मचारी आत गेले की मुख्य गेट बंद केलं जायचं आणि संध्याकाळपर्यंत कोणालाही आत प्रवेश नसायचा. म्हणजे हा सर्व काळाबाजार बंद दरवाजाआड सुरू होता.
या घटनेने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. आपण सावध कसं राहायचं? हा महत्वाचा प्रश्न आहे. पहिलं तर किंमत पाहून हुरळू नका. जर एखादी ब्रँडेड वस्तू बाजारातील किमतीपेक्षा खूपच स्वस्त मिळत असेल, तर संशय घ्या. एक्सपायरी डेटची प्रिंट जर पुसट असेल किंवा त्यावर काही खाडाखोड वाटत असेल, तर ती वस्तू घेऊ नका. मोठ्या ब्रँडचं नाव असलं तरी पॅकेजिंग व्यवस्थित तपासणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कुठेही असं काही संशयास्पद आढळलं, तर तात्काळ अन्न सुरक्षा विभागाला कळवा. जयपूरमधील ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असू शकतं. अशा किती व्यापाऱ्यांनी असा माल बाजारात खपवला असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला हे नक्की.




