अभिनेत्रीची प्रतिक्रिया प्रतीक्षेत, सुकेशच्या दाव्याने सोशल मीडियात खळबळ
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 200 कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटकेत असलेला कथित ठग सुकेश चंद्रशेखर याने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जॅकलिनसाठी कोट्यवधींची खास भेट पाठवल्याचा दावा केला आहे.
मंडोली कारागृहातून लिहिलेल्या हस्तलिखित पत्रात सुकेशने (Sukesh) जॅकलिनला प्रेमळ संबोधन करत तिच्यासाठी विशेष सरप्राइज ठेवले असल्याचे म्हटले आहे. “तुझ्यासारख्या क्वीनसाठी खास गिफ्ट अरेंज केलं आहे,” असे तो पत्रात म्हणतो. तुरुंगाच्या भिंतींमुळे तिच्यापासून दूर असल्याची खंत व्यक्त करत त्याने भावनिक शब्दांत आपल्या भावना मांडल्या आहेत. आपल्या कृतींमुळे जॅकलिनला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागल्याबद्दल त्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
यावेळी सुकेशने केलेला सर्वात मोठा दावा म्हणजे जॅकलिनसाठी कस्टमाइज्ड ‘एअरबस एच-सीरीज’ हेलिकॉप्टर खरेदी केल्याचा. Airbus निर्मित या हेलिकॉप्टरच्या इंटेरियरमध्ये ‘JF’ अशी अभिनेत्रीची आद्याक्षरे असतील, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे. एच-सीरीज हेलिकॉप्टरची किंमत मॉडेलनुसार काही कोटींपासून ते शेकडो कोटींपर्यंत जाऊ शकते, असे सांगितले जाते. यापूर्वीही त्याने जॅकलिनला यॉट आणि जेट भेट दिल्याचा दावा केला होता.
दरम्यान, जॅकलिनने याआधीच स्पष्ट केले आहे की तिचा सुकेशशी कोणताही संबंध नाही. मात्र या नव्या दाव्यांवर तिने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
या घडामोडींमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या असून, जॅकलिन या प्रकरणावर काय भूमिका घेते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सुकेशच्या या कथित ‘सरप्राइज’मुळे अभिनेत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.




