इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील नागरिकांवरही झाला असून शहापूर तालुक्यातील तब्बल २३ नागरिक परदेशात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
हे सर्व नागरिक दुबई येथे अडकले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. संबंधित नागरिक टूरच्या माध्यमातून दुबईला गेले होते. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२.४५ वाजताची त्यांची परतीची उड्डाणसेवा नियोजित होती; मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे ही उड्डाणसेवा रद्द करण्यात आली. सध्या हे सर्वजण दुबईतील ए-१ फहादी स्ट्रीटवरील ग्रँड अस्टोरिया हॉटेल येथे वास्तव्यास आहेत. परतीचा प्रवास असल्याने त्यांच्या जवळील आर्थिक तरतूद संपली आहे. हॉटेलचे बिल व इतर खर्च भागविणे आता अशक्य होत असल्याचे त्यांनी कळविले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नागरिकांनी भारत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली असून सुरक्षित परतीची व्यवस्था तसेच आर्थिक सहाय्य द्यावे, अशी विनंती केली आहे. युद्धपरिस्थितीमुळे विविध देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले असल्याच्या बातम्या येत असून, शहापूर तालुक्यातील या २३ नागरिकांच्या सुटकेकडे त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे




