Israel Iran War : युद्धाच्या सावटात ‘ठरलं तर मग’ ठरली आशेचा किरण, इस्रायलमधील डॅनियल कुटुंबाच्या प्रेमाने सायली-अर्जुन भारावले!

spot_img

मराठी भाषेची सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचली सायली-अर्जुनची जादू; तणावपूर्ण वातावरणात मराठी मालिका बनली मनोरंजनाचा आधार

स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने केवळ टीआरपीचे विक्रमच मोडले नाहीत, तर कठीण काळात माणसाला मानसिक आधार देण्याचं कामही केली आहे, याची प्रचिती नुकतीच आली. इस्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या भीषण युद्धजन्य परिस्थितीत तिथल्या डॅनियल कुटुंबाने या मालिकेबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब मराठी भाषिक नसतानाही, युद्धाच्या सततच्या तणावातून मुक्त होण्यासाठी ते एकत्र बसून सायली आणि अर्जुनची गोष्ट पाहतात. डॅनियल कुटुंबाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून केवळ मुख्य जोडीच नाही, तर खलनायिका प्रियाच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे, जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आपल्या मालिकेची ही व्याप्ती पाहून सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी कमालीची भावूक झाली आहे. सध्या ४५ मिनिटांच्या विशेष भागांसाठी मालिकेची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत घेत असताना, सातासमुद्रापार मिळालेली ही कौतुकाची थाप त्यांच्यासाठी ऊर्जा देणारी ठरली आहे. जुईने हा व्हिडिओ शेअर करताना, “आपल्या कामाने अशा संकटकाळात कोणाच्या चेहऱ्यावर हसू उमलत असेल, तर मेहनतीचं सोनं झालं,” अशी भावना व्यक्त केली. तसेच या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तिने देवाकडे प्रार्थनाही केली आहे.

मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनीदेखील डॅनियल कुटुंबाचे आभार मानले आहेत. एका निर्मात्यासाठी यापेक्षा मोठं समाधान दुसरं नसतं की त्यांची कलाकृती जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपऱ्यात माणसांना आनंदाचे काही क्षण देऊ शकते. गेल्या तीन वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेने आता भौगोलिक आणि भाषिक सीमा ओलांडून जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, हेच या घटनेतून सिद्ध होतं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ