बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार म्हणाले, “आमचं विचार जुनं आहे; लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर स्त्रीने घराला प्राधान्य द्यावं असंच मला वाटतं.”
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार (Ismail Durbar) यांनी दिलेल्या एका खास मुलाखतीत सून आणि अभिनेत्री गौहर खानच्या (Gauhar Khan) कामाबाबत थेट मत व्यक्त करताना जुन्या विचारसरणीचा उल्लेख केला आहे.
‘बिग बॉस’ फेम गौहर खानने इस्माइल यांचा मुलगा झैद दरबारशी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलं असून, या दोघांना आता दोन मुलं आहेत. अलीकडेच, सप्टेंबर 2025 मध्ये गौहर पुन्हा आई बनली आहे.
मुलाखतीत इस्माइल दरबार म्हणाले, “गौहर आणि झैदचं नातं खूप छान आहे. त्यांनी पहिल्या मुलाचं संगोपन उत्कृष्टरीत्या केलं. पण मी कधीच गौहरचं काम पाहत नाही, कारण माझ्या विचारसरणीनुसार लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर स्त्रीने घरावर लक्ष केंद्रित करावं.”
ते पुढे म्हणाले, “मी जुन्या पद्धतीच्या कुटुंबात वाढलो आहे. त्यामुळे आमच्या घरातील संस्कार वेगळे आहेत. गौहर आमच्या घराची अब्रू आहे, त्यामुळे तिला काही सांगणं माझं काम नाही, तो निर्णय तिच्या नवऱ्याचा झैदचा अधिकार आहे.”
इस्माइल दरबार यांनी पत्नी आयेशा यांचं उदाहरण देत सांगितलं की, “आयेशाने मुलं झाल्यानंतर काम पूर्णपणे सोडलं. ती तेव्हा शोमधून दरमहा पाच लाख रुपये कमवत होती, पण तरीही तिने घराला प्राधान्य दिलं.”
गौहर खान मात्र आई झाल्यानंतरही आपलं करिअर सांभाळत आहे आणि काम करत आहे. त्यामुळे सासरे आणि सुनेचे विचार यात स्पष्ट तफावत दिसून येते.




