सौदी अरेबिया आणि UAE कडून इराणविरुद्ध लष्करी कारवाईला समर्थनाचे संकेत
इराणविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अनपेक्षित निर्णयामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करण्याची ४८ तासांची मुदत संपत असतानाच, ट्रम्प यांनी अचानक पाच दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. “इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे,” असे ट्रम्प म्हणत असले तरी, त्यांच्या या विधानावर इराणसह जागतिक समुदायाचा विश्वास बसणे कठीण जात आहे. तेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी किंवा मोठ्या हल्ल्याची पूर्वतयारी करण्यासाठी अमेरिकेने रचलेले हे एक ‘धोरणात्मक षडयंत्र’ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, इराणसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत संयम बाळगणारे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) हे देशही आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मधील अडथळ्यांमुळे या आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि व्यावसायिक सुरक्षितता धोक्यात आल्याने, हे देश आता अमेरिका आणि इस्रायलच्या ‘एअर स्ट्राईक’ला उघड समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, जरी हे देश थेट सैन्य उतरवण्यास कतरत असले, तरी इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ते मोठी पावले उचलू शकतात. यामुळे येत्या पाच दिवसांनंतर आखाती क्षेत्रातील युद्धाचे चित्र अधिक भीषण होण्याची चिन्हे आहेत.




