गेल्या 38 दिवसांपासून सुरू असलेल्या आखाती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर थोडा दिलासा देणारी घडामोड घडली आहे. दोन आठवड्यांसाठी युद्धविराम लागू करण्याची घोषणा करण्यात आली असून या निर्णयाला इराणनेही मान्यता दिली आहे.
या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. विशेषतः महत्त्वाची बाब म्हणजे होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली आहे. ही समुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
तथापि, प्रत्यक्ष परिस्थिती अजूनही पूर्णपणे स्थिर झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार इराण आणि इस्रायल यांच्यातील हल्ले अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही काही तासांतच संघर्ष थांबलेला नाही, त्यामुळे पुढील काळात काय घडेल याबाबत अनिश्चितता कायम आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युद्धविरामाची माहिती देताना पुढील टप्प्यात इराणच्या 10 महत्त्वाच्या अटींवर चर्चा होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सध्या जगभरातील देश या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेवर होण्याची शक्यता आहे.




