हैदराबादच्या २०२ धावांच्या आव्हानाचा बेंगळुरूने १५.४ षटकातच केला धुव्वा; नेट रनरेटमध्ये मोठी झेप
आयपीएल २०२६ च्या हंगामात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. इशान किशनच्या खांद्यावर सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती, मात्र पहिल्याच सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या काही धावांतच ३ महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर कर्णधार इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी संयमी खेळी करत डाव सावरला. मधल्या फळीत अनिकेत वर्माने केवळ १८ चेंडूत ४३ धावांची वादळी खेळी केल्यामुळे हैदराबादने धावफलकावर २०१ धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले.
२०२ धावांचे लक्ष्य गाठताना आरसीबीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. विराट कोहलीच्या तुफानी फटकेबाजीसमोर हैदराबादचे गोलंदाज हतबल दिसले. आरसीबीने हे लक्ष्य केवळ १५.४ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. २६ चेंडू राखून मिळालेल्या या विजयामुळे आरसीबीचा नेट रनरेट +२.९०७ वर पोहोचला असून, गुणतालिकेत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे.
पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर इशान किशनने संघात सुधारणेला वाव असल्याचे मान्य केले. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला “सुरुवातीच्या ३-४ षटकांत खेळपट्टी कठीण होती, पण नंतर फलंदाजीसाठी ती सोपी झाली. आम्ही सुरुवातीला विकेट्स गमावल्या, ही आमची चूक होती. विराट कोहलीसारख्या खेळाडूला लवकर बाद करणे गरजेचे असते, अन्यथा त्याला रोखणे अशक्य होते. हा पहिलाच सामना असल्याने चुका स्वीकारार्ह आहेत, पण पुढच्या सामन्यात आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात अधिक मजबूत होऊन पुनरागमन करू.”
कर्णधारपदाच्या अनुभवाबद्दल विचारले असता इशानने सांगितले की, दडपण असले तरी त्याने या भूमिकेचा आनंद घेतला. आता हैदराबादचा संघ आपल्या चुकांमधून धडा घेऊन पुढील सामन्यात विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे.




