गेल्या वर्षीच्या बंगळुरू चेंगराचेंगरीच्या सावटाखाली १९ व्या मोसमाची सुरुवात; चाहत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य.
आयपीएलच्या १९ व्या पर्वाचा बिगुल २८ मार्चपासून वाजणार असून क्रिकेट प्रेमींमध्ये या मोसमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या उर्वरित वेळापत्रकानुसार, यंदा १० संघांमध्ये एकूण ७० सामने रंगणार आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा सलामीच्या सामन्यापूर्वी कलाकारांच्या फौजेसह होणारी रंगारंग ओपनिंग सेरेमनी होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १८ वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, पण या विजयाचा जल्लोष दुर्दैवाने शोकांतिकेत बदलला होता. चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजयाच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची संवेदनशीलता ओळखून आणि मृतांना श्रद्धांजली म्हणून यंदा कोणताही झगमगाटी सोहळा न घेता थेट सामन्यांना सुरुवात करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचे समजते.
आयपीएलच्या इतिहासात सांस्कृतिक कार्यक्रम रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१९ मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते, त्यावेळीही जवानांच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव आणि चाहत्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे ३१ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी ‘क्लोजिंग सेरेमनी’ होणार असल्याचे संकेत ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात दिले आहेत. १२ शहरांमध्ये पसरलेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात आता केवळ खेळावर लक्ष केंद्रित केले जाणार असून, उद्याचा पहिला सामना बंगळुरूतच असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.




