मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा; रोहित शर्माच्या अनुभवापुढे कुलदीप यादवचं ‘अपील’ पडलं फिकं
आयपीएल २०२६ च्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना चांगलाच रंगात आला आहे. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. मुंबईची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या १८ धावांत दोन गडी बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला होता. मात्र, अनुभवी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने संयमी खेळ करत डाव सावरला. पॉवर प्लेच्या सहा षटकांत मुंबईने ४१ धावांपर्यंत मजल मारली. ही जमलेली जोडी फोडण्यासाठी दिल्लीचे गोलंदाज शर्थीचे प्रयत्न करत होते आणि याच प्रयत्नात नवव्या षटकात एक रंजक प्रसंग घडला, ज्याने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.
नववे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू कुलदीप यादव आला होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात विसावला. कुलदीप आणि केएल राहुलला खात्री होती की चेंडू बॅटला लागला आहे, त्यामुळे त्यांनी जोरदार अपील केले. कुलदीपने अक्षर पटेलला रिव्ह्यू (DRS) घेण्याबाबत अक्षरशः विनवणी केली. कुलदीपचा उत्साह पाहून अक्षरने डीआरएस घेतला, पण तोपर्यंत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटले होते. रोहितला बहुधा खात्री होती की चेंडू बॅटला लागलेला नाही आणि कुलदीप पुन्हा एकदा चुकत आहे.
जेव्हा रिप्लेमध्ये ‘अल्ट्राएज’ तपासण्यात आले, तेव्हा स्पष्ट झाले की चेंडू बॅटला नाही तर रोहितच्या पॅडला हलकासा घासून गेला होता. अपील हे झेलबादसाठी असल्याने केवळ तेवढेच तपासले गेले आणि दिल्लीचा रिव्ह्यू वाया गेला. रोहित शर्मा जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार होता, तेव्हाही कुलदीप अशाच प्रकारे डीआरएससाठी आग्रह धरायचा आणि अनेकदा ते निर्णय चुकीचे ठरायचे. त्याच जुन्या आठवणीमुळे रोहितला मैदानात हसू आवरले नसावे. या ड्राम्यानंतर रोहितने आपला खेळ सुरूच ठेवला आणि दिल्लीच्या हाती मात्र निराशा आली.




