३१ सामन्यांचा इतिहास आणि बरोबरीची झुंज; विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी राजस्थान सज्ज, तर मुंबईला हवीये पुन्हा लयीत परतण्याची संधी
आयपीएल २०२६ चा रोमांच आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील १३ व्या सामन्याकडे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत गुजरात आणि चेन्नईसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारून विजयाचा धडाका लावला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने कोलकाताला हरवून सुरुवात चांगली केली असली, तरी दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. आता राजस्थानच्या ‘होमग्राउंड’वर मुंबईला आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे.
इतिहासाचा विचार केला, तर या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. आतापर्यंत झालेल्या ३१ सामन्यांमध्ये मुंबईने १६ तर राजस्थानने १४ वेळा बाजी मारली आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. आकडेवारीवरून स्पष्ट होते की, दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तोड उत्तर देण्यात पटाईत आहेत. विशेष म्हणजे, मुंबईची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २१७ आहे, तर राजस्थाननेही २१२ धावा कुटून आपली फलंदाजीची धार दाखवून दिली आहे. बारसापाराची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे येथे धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
नाणेफेकीचा (Toss) कौलही या सामन्यात निर्णायक ठरू शकतो. आकडेवारीनुसार, राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर अनेकदा प्रथम गोलंदाजी स्वीकारून विजय मिळवला आहे, तर मुंबईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत समतोल राखला आहे. राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळणार असला, तरी मुंबईकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्याने हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगण्याची चिन्हे आहेत. कोण बाजी मारणार आणि गुणतालिकेत वरचा क्रमांक गाठणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




