आयपीएल २०२६ पूर्वी हार्दिकच्या पलटणीला ‘एबीडी’चा सावधगिरीचा इशारा; ‘ट्रेंट बोल्ट’ ठरणार का कमकुवत दुवा?
आयपीएल २०२६ चा रणसंग्राम उद्यापासून सुरू होत असतानाच, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने मुंबई इंडियन्सच्या ताकदीबाबत एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. जरी मुंबईच्या संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव असे जागतिक दर्जाचे ‘मॅच विनर्स’ असले, तरी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा यंदा चिंतेचा विषय ठरू शकतो, असे डिविलियर्सला वाटते. त्याच्या मते, २०१५ ते २०२० या काळात बोल्ट ज्या वेगाने आणि स्विंगने फलंदाजांना थरकाप उडवायचा, ती ‘स्पायसी’ गोलंदाजी आता दिसत नाहीये. बोल्टचा वेग आता १४० किमीच्या खाली घसरल्याने तो पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या निशाण्यावर असू शकतो, अशी शंका त्याने ‘आयपीएल विश्लेषण’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
डिविलियर्सने बोल्टची तुलना भुवनेश्वर कुमारच्या सध्याच्या स्थितीशी केली असून, त्याच्या अलीकडील SA20 लीगमधील खराब कामगिरीचा दाखला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या लीगमध्ये मुंबई केप टाऊनकडून खेळताना बोल्टने १० सामन्यांत केवळ ८ विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेटही ९.८२ पर्यंत वाढला होता. एकेकाळी धावा रोखून धरण्यात माहीर असलेला बोल्ट आता महागडा ठरत असल्याने, प्रतिस्पर्धी संघ याचा फायदा घेऊ शकतात, असा इशारा डिविलियर्सने दिला आहे. मुंबई इंडियन्सकडे मजबूत फळी असली तरी, बोल्टचा कमी झालेला वेग आणि फिरकी गोलंदाजीतील उणीव यामुळे पाचवेळच्या चॅम्पियन्सना यंदा मैदानावर विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.




