सलग पाच दिवसांची घोटाळलेली फ्लाइट सेवा; प्रवाशांसह सेलिब्रिटीही त्रस्त
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची परिस्थिती गंभीर झाली असून सलग पाचव्या दिवशीही त्यांच्या फ्लाइट्स विस्कळीत आहेत. देशभरातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, रात्रभर प्रतीक्षा आणि मानसिक त्रास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लाइट्स उशिरा धावल्यामुळे किंवा रद्द झाल्यामुळे प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.
इंडिगोची सेवा गडबडल्याचा थेट परिणाम इतर विमान कंपन्यांच्या भाड्यांवरही दिसतोय. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या मेट्रो शहरांत तिकीटाचे दर दुपटीहून अधिक वाढले असून सामान्य प्रवाशांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांचेच बजेट कोलमडले आहे.
याच गोंधळाचा फटका गायक राहुल वैद्यलाही बसला. गोव्याहून कोलकाता शोसाठी रवाना होण्याच्या तयारीत असताना त्याचा दिवस अक्षरशः वाईट गेल्याचे त्याने सांगितले. इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने हातात अनेक बोर्डिंग पास असलेला फोटो शेअर करत माहिती दिली की, या प्रवासासाठी त्याला तब्बल 4.2 लाख रुपये खर्च करावे लागले. एअर इंडियाच्या तिकिटांसह घेतलेल्या फोटोमध्ये त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती.
फक्त राहुल वैद्यच नव्हे, तर अनेक कलाकार आणि प्रवासी या परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत. दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या अनेक विमानांची तिकिटे दुप्पट-किंवा अधिक भावात विकली जात आहेत. विमानतळांवर इंडिगोची विमाने उभी असून सेवेत मोठ्या प्रमाणात उशीर होताना दिसत आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हस्तक्षेप केला असून सेवा लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही सध्या प्रवाशांचे हाल मात्र सुरूच आहेत.




