भारतात श्रीमंतापासून ते सामान्य वर्गातील व्यक्ती हा रेल्वेतून प्रवास करतो. मात्र जर तुम्ही जनरल डब्ब्यातून प्रवास करत असाल तर अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो, यावरच आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेत आठवड्याला तब्बल 52 सुधारणा करण्याचे मोठे उद्दिष्ट जाहीर केले आहे. या उपक्रमाची सुरुवात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील स्वच्छतेपासून होणार आहे. आतापर्यंत एसी आणि स्लीपर कोचमध्येच नियमित स्वच्छता केली जात होती. मात्र आता जनरल डब्यांनाही तितक्याच प्राधान्याने स्वच्छ ठेवले जाणार आहे. जनरल डब्यातील शौचालये, वॉशबेसिन आणि कचरापेट्या दररोज साफ केल्या जातील. पूर्वी धावत्या गाड्यांमध्ये जनरल डबे इतर कोचशी आतून जोडलेले नसल्याने तेथे स्वच्छता करणे कठीण होत असे. आता गाडी स्टेशनवर थांबल्यानंतर कर्मचारी आरक्षित डब्यातून उतरून जनरल डब्यांमध्ये जाऊन स्वच्छतेचे काम पूर्ण करतील.
रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 500 गतीशक्ती कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत सुरू झालेल्या कार्गो टर्मिनल्समुळे आधीच 20 हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे. स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कर्मचारी काम पूर्ण केल्यानंतर डब्यांचे फोटो कंट्रोल रूमला पाठवतील. एआयच्या मदतीने त्या फोटोंची तपासणी होईल तसेच प्रशिक्षित आणि अनुभवी कंपन्यांचीच नियुक्ती केली जाईल. सुपरवायझरला 12 वी उत्तीर्ण आणिआयटीआय पात्रता आवश्यक असेल. तसेच काम निकृष्ट आढळल्यास संबंधित कंपनीवर दंड आकारला जाईल.




