इराण आणि इस्रायल तसेच अमेरिकेतील वाढत्या तणावाचा जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः, होर्मुझच्या महत्त्वाच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर हल्ल्यांचा धोका वाढल्याने मध्य पूर्वेकडून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, अनेक देश इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शेजारील बांग्लादेशने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भारताकडे मदतीची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बांगलादेश एप्रिल महिन्यापर्यंत भारतातून अतिरिक्त सुमारे 45,000 टन डिझेल आयात करणार आहे.
बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC) च्या माहितीनुसार,अलीकडेच भारतातून 5,000 टन डिझेल बांगलादेशात पोहोचले असून 18 किंवा 19 मार्चदरम्यान आणखी 5,000 टन डिझेल येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय भारताकडून आणखी 40,000 टन डिझेल आयात करण्याचा प्रस्ताव मिळाल्याची माहिती बीपीसीचे महाव्यवस्थापक मोहम्मद मुर्शेद हुसेन आझाद यांनी दिली. आवश्यक आर्थिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिलपर्यंत ही अतिरिक्त इंधन खेप बांगलादेशात पोहोचेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत आणि बांगलादेशदरम्यान डिझेलची वाहतूक मुख्यतः बांगलादेश-भारत मैत्री पाईपलाईन द्वारे केली जाते. ही पाइपलाइन भारतातील नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडला उत्तर बांगलादेशातील पारबतीपूर येथील इंधन डेपोशी जोडते. सीमापार उर्जा व्यापार सुलभ करण्यासाठी आणि बांगलादेशला इंधनाचा स्थिर पत्ता लागावा यासाठी २०३ मार्च २०३ मध्ये नरेंद्र मोदी आणि शेख हसिना यांनी या नवीन लाइनचे संयुक्तपणे उद्घाटन केले होते.
पाइपलाइन सुरू होण्यापूर्वी भारतातून डिझेलची वाहतूक प्रामुख्याने रेल्वे वॅगनद्वारे केली जात होती, ज्यामुळे पुरवठा प्रक्रिया अधिक वेळखाऊ आणि गुंतागुंतीची होती. दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन बांगलादेशात काही काळ इंधन विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र आगामी सणासुदीच्या काळात, भारत ईद अल-फित्र निमित्त मोठ्या प्रमाणावर प्रवास होणार असल्याने सरकारने हे निर्बंध हटवले आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, भारतातून होणारी अतिरिक्त डिझेल आयात देशातील इंधन पुरवठ्यावरचा ताण कमी करेल आणि सणासुदीच्या काळात नागरिकांना पुरेसा इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत करेल.




