पाच वैयक्तिक लढती बदलतील का सामन्याचं चित्र?
भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या उत्कंठेला आज अखेर विराम मिळणार आहे. टी-20 वर्ल्डकप 2026 मधील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना आज, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याला अवघे काही तास उरले असताना दोन्ही संघांतील खेळाडूंच्या आमनेसामने होणाऱ्या लढतींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या सामन्यात फक्त दोन संघच नव्हे, तर खेळाडूंमधील वैयक्तिक द्वंद्वेही रंगणार आहेत. अशाच पाच महत्त्वाच्या लढती या सामन्याचा निकाल ठरवू शकतात.
१) अभिषेक शर्मा विरुद्ध शाहीन आफ्रिदी
आशिया कप 2025 मध्ये या दोघांमधील सामना चांगलाच चर्चेत राहिला होता. शाहीन आफ्रिदीविरुद्ध अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत धावा काढल्या होत्या. आकडेवारी पाहता, शाहीन अजूनही अभिषेकला बाद करू शकलेला नाही, त्यामुळे आजची ही लढत पुन्हा लक्षवेधी ठरणार आहे.
२) साहिबजादा फरहान विरुद्ध जसप्रीत बुमराह
पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यातील सामना देखील तितकाच रोचक ठरण्याची शक्यता आहे. फरहानने बुमराहविरुद्ध धावा केल्या असल्या तरी, बुमराहला आज पहिल्यांदा त्याचा विकेट मिळवण्याची संधी असेल.
३) तिलक वर्मा विरुद्ध अबरार अहमद
भारतीय युवा फलंदाज तिलक वर्मा आणि पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद यांच्यातील लढत मधल्या फळीत निर्णायक ठरू शकते. आतापर्यंत अबरारला तिलकला बाद करण्यात यश आलेले नाही.
४) सॅम अयुब विरुद्ध अर्शदीप सिंग
पाकिस्तानकडून डावाची सुरुवात करणारा सॅम अयुब आणि भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यात नवीन चेंडूवर रंगणारी लढत सामन्याची दिशा बदलू शकते.
५) उस्मान तारिक विरुद्ध हार्दिक पंड्या
आपल्या गोलंदाजी अॅक्शनमुळे चर्चेत असलेला उस्मान तारिक भारतीय फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. विशेषतः हार्दिक पंड्याविरुद्ध त्याची गोलंदाजी पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असणार आहे.
एकूणच, भारत-पाकिस्तान या महामुकाबल्यात संघांइतक्याच खेळाडूंच्या या पाच वैयक्तिक लढती सामन्याची रंगत आणि निकाल ठरवू शकतात.




