T20 वर्ल्ड कप फायनल: किवी कॅप्टनने दिली पॅट कमिन्सची आठवण, ‘सूर्या’ने लावला शॉक
टीम इंडियाची डरकाळी आणि किवींचा ‘सायलेन्स’ प्लॅन
आज अवघ्या जगाचे लक्ष भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या महामुकाबल्याकडे लागले आहे. भारत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे, तर न्यूझीलंड आपल्या पहिल्या जेतेपदाच्या शोधात आहे. मात्र, या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी मैदानाबाहेर शाब्दिक युद्ध रंगले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय प्रेक्षकांना ‘शांत’ करण्याची धमकी दिली. “अहमदाबादमधील १ लाखांहून अधिक प्रेक्षकांना गप्प करणे हेच आमचे उद्दिष्ट असेल,” असे खळबळजनक विधान सँटनरने पत्रकार परिषदेत केले.
सूर्याचा ‘कूल’ अंदाज: “तीच ती लाईन किती वेळा?”
सँटनरच्या या विधानाचा समाचार भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या खास शैलीत घेतला. सूर्या म्हणाला, “सगळे जण तीच एक लाईन कॉपी-पेस्ट करत आहेत, आता काहीतरी नवीन बोला!” सूर्याने यावेळी स्पष्ट केले की, भारतीय संघ सध्या अतिशय रिलॅक्स असून मायदेशात संघाचे नेतृत्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. फायनलचा दबाव नाकारता येणार नाही, पण या मोठ्या मंचाचा आनंद लुटणे आणि उत्साहाने खेळणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्याने सांगितले.
जुन्या विजयांचा आत्मविश्वास आणि विजयाचा निर्धार
भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या मालिकेत न्यूझीलंडला 4-1 ने धूळ चारली होती. याच अनुभवाच्या जोरावर सूर्याने किवी संघाला इशारा दिला आहे. “आम्ही नुकतेच त्यांच्याविरुद्ध खेळलो आहोत, त्यामुळे त्यांची ताकद आम्हाला माहित आहे. ते चांगले खेळत असले तरी आमचा संघही फॉर्ममध्ये आहे,” असा विश्वास सूर्याने व्यक्त केला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत किवींचा ‘गेम’ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.




