spot_img

IND vs NZ : वर्ल्ड कपआधी सूर्यकुमार यादवचा दमदार कमबॅक गावस्करांकडून मुक्तकंठाने कौतुक

spot_img

सलग दोन अर्धशतकांनी टीकाकारांना दिलं उत्तर

गेल्या जवळपास वर्षभरापासून फॉर्मशी झुंज देणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर सूर गवसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत त्याने सलग दोन अर्धशतके झळकावत आपल्या पुनरागमनाची जोरदार घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सूर्याचा हा फॉर्ममध्ये परतणे टीम इंडियासाठी दिलासादायक ठरले आहे.

गेल्या काही काळापासून सूर्यकुमार यादववर सातत्याने टीका होत होती. त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीत आत्मविश्वास, अचूक टायमिंग आणि सहजता दिसू लागली आहे. वर्ल्ड कपआधी योग्य वेळी सूर्या फॉर्ममध्ये आल्याने संघ व्यवस्थापनासह चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

या पुनरागमनानंतर ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर (Sunil Gavskar) यांनी सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव केला. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले की, “रायपूरमधील खेळीने सूर्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. गुवहाटीमध्ये तो अधिक सहजतेने खेळताना दिसला. तो पूर्णपणे फॉर्मबाहेर होता असं नाही, पण त्याच्याकडून मोठ्या धावा येत नव्हत्या.”

आकडेवारी पाहिली तर 12 ऑक्टोबर 2024 नंतर सूर्यकुमार यादवने तब्बल 23 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. या काळात त्याने फक्त एकदाच 40 धावांचा टप्पा ओलांडला होता, उर्वरित सामन्यांत त्याच्या धावा 30 च्या आतच मर्यादित राहिल्या. रायपूरमध्ये मात्र हा दुष्काळ संपला.

त्या सामन्यात पावरप्लेनंतर सूर्याने आपला खेळ उंचावला आणि सेट झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इशान किशनसोबतच्या वादळी भागीदारीच्या जोरावर भारताने 209 धावांचे मोठे लक्ष्य सहज पार केले.

गावस्कर पुढे म्हणाले, “नेट्समध्ये सूर्य नेहमीच चांगली फलंदाजी करत होता. सरावात तो चारही बाजूंनी शॉट्स मारत होता. फक्त सामन्यांत यश मिळत नव्हतं. कधी कधी एखाद्या मोठ्या इनिंगची गरज असते आणि रायपूरची खेळी त्याच्यासाठी तशीच ठरली.”

आता सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीकडे आहे—सूर्यकुमार यादवचा हा फॉर्म टी-20 वर्ल्ड कप संपेपर्यंत कायम राहतो का. कारण विजेतेपद राखण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर उभे आहे, आणि त्या मोहिमेत सूर्या पुन्हा एकदा कळीचा खेळाडू ठरणार, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ