spot_img

IND vs NZ : बुमराहचा वादळी कमबॅक! न्यूझीलंडविरुद्ध 3-0 क्लीन स्वीपमध्ये भारताची दमदार कामगिरी

spot_img

गुवहाटी टी-20 मध्ये 17 धावांत 3 विकेट्स; सुनील गावस्करांनी भरभरून केलं कौतुक

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला असून न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. गुवहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

पहिल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करता तीन ओव्हरमध्ये 29 धावा देणाऱ्या बुमराहला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात पुन्हा संधी मिळताच त्याने जबरदस्त पुनरागमन केलं. पाचव्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला येताच पहिल्याच चेंडूवर टिम सीफर्टला क्लीन बोल्ड करत त्याने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला.

यानंतर बुमराहने मिचेल सँटनर आणि काइल जेमीसन यांनाही माघारी पाठवत आपला प्रभाव कायम ठेवला. चार ओव्हरमध्ये अवघ्या 17 धावा देत 3 विकेट्स घेणं ही त्याची खास कामगिरी ठरली.

बुमराहच्या या भेदक गोलंदाजीने माजी महान फलंदाज सुनील गावस्करही भारावून गेले. स्टार स्पोर्ट्सवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “बुमराह संघात असला की सामना 20 ऐवजी 16 ओव्हरचा वाटतो. 17 धावांत तीन विकेट्स… अफलातून! तो खरोखरच सर्वोत्तम आहे,” अशा शब्दांत कौतुक केलं.

या सामन्यासाठी अर्शदीप सिंगच्या जागी बुमराहला संघात स्थान देण्यात आलं होतं. अर्शदीपने मागील सामन्यात 53 धावा देत एकही विकेट न घेतल्यामुळे हा बदल करण्यात आला. तसेच कुलदीप यादवऐवजी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आणि त्यानेही चार ओव्हरमध्ये 18 धावा देत 2 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली.

भारत-न्यूझीलंडमधील ही पाच सामन्यांची टी-20 मालिका आगामी टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची महत्त्वाची तयारी मानली जात आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 8 मार्च रोजी खेळवली जाणार असून भारत आणि श्रीलंका हे यजमान देश असणार आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ