न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) भन्नाट मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. वडोदऱ्यात होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार सराव केला. याच सराव सत्रात विराटने युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची नक्कल करत मजा उडवली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये माजी कर्णधार विराट कोहली सरावादरम्यान अर्शदीपच्या पळण्याच्या स्टाईलची नक्कल करताना दिसतो. हे पाहून रोहित शर्माला देखील हसू आले. शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी विराट आणि रोहित यांनी ट्रेनिंगमध्ये चांगला फॉर्म दाखवला.
वनडे मालिका रविवारी सुरू होणार असून, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका, टी20 वर्ल्ड कप आणि आयपीएल अश्या महत्त्वाचा टी20 हंगाम भारतासाठी असणार आहे. विजय हजारे ट्रॉफीत प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर विराट आणि रोहित यांनी सुमारे दीड तास नेट्समध्ये घाम गाळला. भारतीय वेगवान गोलंदाज, फिरकीपटू आणि थ्रोडाउन स्पेशालिस्ट्सचा त्यांनी आत्मविश्वासाने सामना केला. विराट कोहलीने घरगुती स्पर्धेत 77 आणि 131 धावा करत आपली फॉर्म पुन्हा सिद्ध केली आहे. नेट्समध्ये त्यांनी वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली, तसेच थ्रोडाउन स्पेशालिस्ट्सच्या अवघड बाउन्सलाही समर्थपणे तोंड दिलं.
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.




