spot_img

IND vs NZ 1st ODI : रोहित बाद होताच जल्लोष, विराट आला की टाळ्यांचा कडकडाट; प्रेक्षकांच्या वर्तनावर कोहली नाराज

spot_img

वडोदऱ्यातील भारत–न्यूझीलंड पहिल्या वनडेनंतर विराट कोहलीने मांडली मनातील खंत; चाहत्यांच्या वागणुकीवर व्यक्त केल्या भावना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वडोदऱ्यात पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने चार विकेट्सने विजय मिळवत मालिकेची दमदार सुरुवात केली. मात्र या सामन्यादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे विराट कोहली नाराज झाला असून, त्याने सामना संपल्यानंतर यावर उघडपणे भाष्य केलं.

सामान्यतः भारतीय संघाचा एखादा फलंदाज बाद झाल्यावर स्टेडिअममध्ये शांतता पसरते. पण सध्या चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. रविवारी 9व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा बाद झाला आणि लगेचच विराट कोहली फलंदाजीसाठी येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रोहित बाद झाल्याचं दु:ख न दाखवता, चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात विराटचं स्वागत केलं, जणू हा आनंद साजरा करण्याचा क्षणच होता.

या प्रकाराबद्दल पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला, “चाहत्यांचा उत्साह मला समजतो, पण एखादा खेळाडू बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना असं वर्तन त्याच्यासाठी चांगलं नसतं. मला हे आवडत नाही.” त्याने यापूर्वी एम.एस. धोनीसोबतही असाच अनुभव आल्याचं नमूद केलं.

तरीसुद्धा विराटने चाहत्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितलं की, “मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. फॅन्सकडून मिळणारं प्रेम हे कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही. लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. मी माझं स्वप्न जगतोय.”

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 29 चेंडूत 26 धावा केल्या. विराट कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी करत 93 धावांची खेळी साकारली, मात्र त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही त्याची सलग पाचवी वेळ ठरली. भारताने हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली असली, तरी प्रेक्षकांच्या बदललेल्या वर्तनावर विराट कोहलीने व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ