Hormuz Strait : ‘होर्मूज’च्या युद्धज्वाळांतून भारतीय जहाजाची यशस्वी सुटका; ‘लोथल’ बंदराचा दाखला देत इराणकडून भारताचे कौतुक

spot_img

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला असताना, भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने सुरक्षेच्या कारणास्तव ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ (होर्मूजची सामुद्रधुनी) हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केला असूनही, भारताचे ‘ग्रीन सानवी’ हे जहाज या धोकादायक क्षेत्रातून सुखरूप बाहेर पडले आहे. तब्बल ४६,६५० टन एलपीजी (LPG) गॅसचा साठा घेऊन हे जहाज आता भारताच्या दिशेने निघाले आहे. विशेष म्हणजे, जगाचा २५ टक्के आणि भारताचा ४० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा याच मार्गावरून होत असल्याने, या जहाजाचे सुरक्षित आगमन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

या यशस्वी मोहिमेनंतर गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करत याला भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला इराणच्या दूतावासाने दिलेला प्रतिसाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. इराणने भारत आणि विशेषतः गुजरातचे कौतुक करताना ४००० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा संदर्भ दिला. सिंधू संस्कृतीच्या काळातील ‘लोथल’ बंदराचा उल्लेख करत इराणने म्हटले की, “भारत आणि गुजरातचे इराणच्या हृदयात खास स्थान आहे. आमचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपासून प्राचीन सागरी मार्गांनी जोडलेले आहेत.” या विधानामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे नवे पर्व अधोरेखित झाले आहे.

युद्धकाळात होर्मूजच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितरीत्या बाहेर पडलेले हे भारताचे सातवे जहाज आहे. यापूर्वी सहा जहाजे यशस्वीपणे मायदेशी परतली असली, तरी अजूनही भारताची १७ जहाजे या तणावपूर्ण मार्गावर अडकून पडली आहेत. अशा कठीण परिस्थितीतही इराणने भारताला दिलेली ही विशेष सवलत आणि दाखवलेली आपुलकी जागतिक राजकारणात भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक मानली जात आहे. भारताची कुटनीती आणि इराणसोबतचे ऐतिहासिक संबंध यांमुळेच हा इंधन पुरवठा सुरू राहणे शक्य झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ