मुंबई–पुण्यासारख्या मेट्रो शहरांसाठी स्मार्ट होम डेकोर टिप्स
मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. त्यामुळे बहुतांश फ्लॅट्स आकाराने लहानच असतात. यामध्ये घराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असलेला लिव्हिंग रूमही मर्यादित जागेचा असतो. अशा परिस्थितीत कमी जागेत बसणारे आणि घराचा लूक खुलवणारे फर्निचर निवडणे फार महत्त्वाचे ठरते.
तज्ज्ञांच्या मते, लिव्हिंग रूम लहान असेल तर अनावश्यक सामान टाळणेच योग्य. अशावेळी २ किंवा ३ सीटरचा कॉम्पॅक्ट सोफा सेट हा उत्तम पर्याय ठरतो. सध्या बाजारात विविध रंग, डिझाईन आणि फॅब्रिकमध्ये सोफे उपलब्ध असल्याने घराच्या भिंतींच्या रंगाशी जुळणारा सोफा निवडता येतो. सोफ्याच्या सोबत छोटं सेंटर टेबल किंवा ऑटमन ठेवल्यास रूमचा लूक अधिक उठावदार दिसतो.
जागेची अडचण असल्यास बीन बॅग्ज किंवा सोफा-कम-बेडसारखे मल्टीपर्पज फर्निचरही वापरता येते. याशिवाय हलक्या वजनाची पोर्टेबल टेबल्स, साईड टेबल्स आणि फोल्डिंग खुर्च्या छोट्या घरांसाठी फारच उपयुक्त ठरतात.
लिव्हिंग रूममध्ये भिंतीचा योग्य वापर केल्यास जागा वाचते. भिंतीत बसवलेले बुक शेल्फ, स्लिम टीव्ही युनिट यामुळे रूम अधिक नीटनेटकी आणि आकर्षक दिसते. तसेच खिडकी किंवा बाल्कनीसाठी गडद पडद्यांऐवजी हलक्या रंगाचे, साध्या डिझाईनचे पडदे लावल्यास खोली प्रशस्त वाटते.
फ्लोअर कारपेटचाही घराच्या लूकवर मोठा प्रभाव पडतो. वेगवेगळ्या डिझाईनचे कारपेट लिव्हिंग रूमला एथनिक आणि स्टायलिश टच देतात. योग्य फर्निचर आणि सजावटीच्या कल्पनांमुळे लिव्हिंग रूम लहान असला तरी तो मोकळा आणि आकर्षक नक्कीच दिसू शकतो.




