पुणे, नाशिक, धुळे, वाशिममध्ये मुसळधार पाऊस; जळगावला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी.
राज्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज दुपारच्या सुमारास राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपीट झाली. या अनपेक्षित पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून शहरांमध्येही नागरिकांची धावपळ उडाली.
पुणे शहरासह भोर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. उत्रौली परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने रस्ते अक्षरशः गारांनी पांढरे झाले होते. या पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड भागातही अचानक वातावरण बदलून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र शेतीवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर परिसरात रिमझिम पावसाने सुरुवात होऊन काही ठिकाणी गारपीट झाली. कांदा, मका, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुसुंबा गावातही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मिरगाव, पाथरे आणि वावी परिसरात या पावसामुळे शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव आणि देशवंडी भागात गारपीटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा आणि गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यासाठी पुढील 48 तासांसाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत जोरदार वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 1 एप्रिलला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून 2 एप्रिलपासून परिस्थिती काहीशी स्थिर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे आणि वादळी वाऱ्यापासून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




