spot_img

Health Tips : टॉयलेटमध्ये १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे ठरू शकते जीवघेणे; तज्ज्ञांचा इशारा

spot_img

रील्स पाहण्याच्या नादात वाढतो पाईल्स, सर्व्हायकल आणि पचनाच्या गंभीर समस्यांचा धोका

आजच्या डिजिटल युगात मोबाईलशिवाय एक क्षणही राहणे अनेकांना कठीण झाले आहे. सोशल मीडिया, रील्स आणि चॅटिंगमुळे लोक अगदी टॉयलेटमध्येही मोबाईल वापरतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हळूहळू धोकादायक ठरत असल्याचे तज्ज्ञ आणि संशोधनातून समोर आले आहे.

टॉयलेट सीटवर गरजेपेक्षा जास्त वेळ बसल्याने गुदाशयावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे पाईल्स (मूळव्याध) होण्याची शक्यता लक्षणीय वाढते. तसेच पोटावर दबाव वाढल्याने पचनक्रिया मंदावते आणि कब्जासारख्या समस्या उद्भवू शकतात.

याचा परिणाम फक्त पचनसंस्थेपुरताच मर्यादित राहत नाही. मोबाईल पाहण्यासाठी सतत खाली मान झुकवल्याने मान, खांदे आणि पाठीच्या स्नायूंवर ताण पडतो. यामुळे स्नायूंमध्ये वेदना, आकसणे आणि पाठदुखीची तक्रार वाढते. काही प्रकरणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा धोका देखील वाढू शकतो.

तसेच टॉयलेटमध्ये मोबाईल नेल्याने त्यावर घातक जंतू आणि बॅक्टेरिया जमा होतात. हा मोबाईल नंतर चेहऱ्याजवळ किंवा अन्न खाताना हातात आल्यास संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शौचाच्या वेळी मेंदू आणि शरीर यांचा समन्वय महत्त्वाचा असतो. मात्र मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे मेंदूचे लक्ष विचलित होते आणि शरीराची नैसर्गिक साफसफाईची प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे पोट पूर्ण स्वच्छ न होता हळूहळू विविध आजारांची शक्यता वाढते. म्हणूनच टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय तात्काळ बदलणे गरजेचे असून, आरोग्य जपण्यासाठी या सवयीवर नियंत्रण ठेवणेच योग्य ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ