spot_img

Health Tips : पंतप्रधान मोदींच्या उल्लेखानंतर चर्चेत आलेलं ‘सी बकथॉर्न’ छोटंसं फळ, मोठे आरोग्यदायी फायदे

spot_img

अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा फॅटी ॲसिड्स आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण पर्वतीय फळाची वाढती मागणी

आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी राहणं ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच अनेकजण डाएट, योग, व्यायाम आणि नैसर्गिक आहाराकडे वळताना दिसतात. भारतात विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळी फळं आणि पिकं आढळतात. त्यापैकीच एक कमी परिचित पण अत्यंत गुणकारी फळ म्हणजे सी बकथॉर्न (Sea Buckthorn).

नुकत्याच एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या फळाचा उल्लेख केल्यानंतर सी बकथॉर्न अचानक चर्चेत आलं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक नागरिकांनी या फळाबद्दल इंटरनेटवर माहिती शोधण्यास सुरुवात केली. याआधी हे लहानसं, पिवळ्या-केशरी रंगाचं फळ फारसं कुणाच्या परिचयाचं नव्हतं.

सी बकथॉर्न हे प्रामुख्याने पर्वतीय भागात आढळणारं फळ असून ते पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. हे एक फ्लॉवरिंग प्लांट असून त्याच्या फळांचा वापर रस, सप्लिमेंट्स किंवा थेट फळ म्हणून केला जातो. डॉक्टरांच्या मते, या फळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून सुमारे 190 पेक्षा अधिक बायोॲक्टिव्ह न्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे पुरुष आणि महिला दोघांसाठीही हे फळ सुरक्षित आणि उपयुक्त मानलं जातं.

सी बकथॉर्नमध्ये ओमेगा-3, ओमेगा-6, ओमेगा-7 आणि ओमेगा-9 यांसारखे फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. यासोबतच खनिजं आणि जीवनसत्त्वांचाही साठा असल्याने हे फळ एक प्रकारचं नैसर्गिक पॉवर पॅक मानलं जातं. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचं सेवन केल्यास त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, सी बकथॉर्न ही एक औषधी वनस्पती असून तिला चुकू फळ किंवा लेह बेरी असेही म्हटलं जातं. या फळाच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सर्दी, खोकला, व्हायरल संसर्ग यांपासून शरीराचं संरक्षण होतं. तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास हे फळ मदत करतं.

सी बकथॉर्न पचनसंस्थेसाठीही फायदेशीर आहे. गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटाची जळजळ आणि अल्सर यांसारख्या समस्यांवर ते उपयोगी ठरते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ उपयुक्त असून रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतं.

त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही सी बकथॉर्न अत्यंत लाभदायक आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरुम कमी होण्यास मदत होते. केस गळती कमी होते आणि त्वचेला आतून पोषण मिळतं. यकृत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठीही हे फळ फायदेशीर असून फॅटी लिव्हरच्या समस्येत मदत करू शकतं. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते उपयुक्त मानलं जातं.

एकूणच, आकाराने लहान असलं तरी सी बकथॉर्न हे फळ आरोग्याच्या दृष्टीने मोठा खजिना आहे. पंतप्रधानांच्या उल्लेखानंतर या फळाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं असून, भविष्यात ते सुपरफूड म्हणून अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ