आयुर्वेद काय सांगतो? रोज लिंबू पाणी पिण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्याच
लिंबू हे पोषक घटकांनी भरलेलं फळ असून आरोग्यासाठी अनेक फायदे देणारं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण आपल्या दैनंदिन आहारात लिंबू पाण्याचा समावेश करतात. मात्र, एक महत्त्वाचा प्रश्न कायम उपस्थित होतो—लिंबू पाणी किती दिवस सलग प्यावं आणि ते रोज पिणं सुरक्षित आहे का?
आयुर्वेदानुसार, लिंबू आंबट रसयुक्त असून तो वात आणि कफ दोष कमी करण्यास मदत करतो. यामुळे पचनसंस्था बळकट होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने होते. योग्य पद्धतीने घेतल्यास लिंबू पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते.
आरोग्य सुधारण्यासाठी लिंबू पाणी २० ते ३० दिवस सलग घेता येते. चयापचय सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्याच्या उद्देशाने अनेक जण १५ ते २१ दिवस नियमित लिंबू पाणी पितात. मात्र, आयुर्वेदानुसार महिनाभर सतत सेवन केल्यानंतर किमान एक आठवड्याचा ब्रेक घेणं आवश्यक मानलं जातं.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. यासोबतच ते प्रभावी अँटिऑक्सिडेंट असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. लिंबू पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं, त्वचेला नैसर्गिक तेज देतं आणि किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासही उपयोगी ठरू शकतं.
वैज्ञानिकदृष्ट्याही लिंबू पाणी हे आरोग्यासाठी उपयुक्त पेय मानलं जातं. मात्र, त्याचं सेवन मर्यादित प्रमाणातच सुरक्षित समजलं जातं. दिवसभरात फक्त एक ग्लास (२०० ते २५० मिली) लिंबू पाणी पुरेसं असतं. ते कोमट पाण्यात मिसळून, सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या सुमारे ३० मिनिटे आधी पिणं अधिक फायदेशीर ठरतं.
लिंबू पाणी तयार करताना एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळावा. चवीसाठी हवे असल्यास थोडं मध घालता येतं. मात्र, ज्यांना अॅसिडिटी, गॅस, पोटदुखी किंवा दातांची संवेदनशीलता आहे, त्यांनी लिंबू पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावं. खबरदारी म्हणून असे लोक आठवड्यातून ४ दिवसांपुरतं सेवन करू शकतात. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि थोडी काळजी घेतली तर लिंबू पाणी नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.




