अपुऱ्या आहारामुळे वाढता कल, पण अतिवापर ठरू शकतो धोकादायक; नैसर्गिक पोषक तत्त्वांना प्राधान्य देणं काळाची गरज
आजच्या धावपळीच्या युगात सकस आहार घेणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. कामाचा वाढता ताण, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडच्या वाढत्या सवयींमुळे शरीरात आवश्यक पोषक घटकांची कमतरता निर्माण होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी सध्या ‘मल्टीव्हिटॅमिन’ घेण्याकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हिटॅमिन A, B, C, D, E यांसारख्या जीवनसत्त्वांसोबतच लोह, कॅल्शियम आणि जस्त यांचा समावेश असलेली ही औषधे शरीराला ऊर्जा देतात आणि थकवा दूर करतात, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःहून अशा गोळ्या सुरू करणे आरोग्यासाठी फायद्याऐवजी तोट्याचे ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही संतुलित आहार घेत असाल, ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे, तर तुम्हाला वेगळ्या मल्टीव्हिटॅमिनची गरज भासत नाही. अन्नातून मिळणारी पोषक तत्त्वे शरीर नैसर्गिकरीत्या शोषून घेते. याउलट, व्हिटॅमिन A, D, E आणि K यांसारखी ‘फॅट सोल्युबल’ जीवनसत्त्वे शरीरात साठून राहतात. जर यांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले, तर त्याचे यकृत किंवा इतर अवयवांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ‘शक्तीची गोळी’ म्हणून स्वतःच्या मनाने मल्टीव्हिटॅमिन घेणे टाळायला हवे.
तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत मल्टीव्हिटॅमिन वरदान ठरू शकतात. गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या माता, वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना एखादा गंभीर आजार आहे, अशा लोकांसाठी डॉक्टर स्वतःहून हे पूरक आहार सुचवतात. थोडक्यात सांगायचे तर, मल्टीव्हिटॅमिन हे संतुलित आहाराचा ‘पर्याय’ नसून केवळ एक ‘पूरक’ साधन आहे. आरोग्यासाठी नैसर्गिक आहार हाच सर्वोत्तम मार्ग असून, कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी रक्ताची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही हिताचे ठरते.




