डिटॉक्स, वजन घट आणि पचनासाठी फायदेशीर म्हणवलं जाणारं गरम पाणी नेमकं कोणासाठी योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. सोशल मीडियावर योगगुरू, फिटनेस ट्रेनर्स आणि हेल्थ (Health) एक्सपर्ट्स सकाळी उठताच रिकाम्या पोटी गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देताना दिसतात. यामुळे शरीर डिटॉक्स होते, पचन सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते आणि दिवसभर ऊर्जा मिळते, असे अनेक दावे केले जातात. मात्र ही सवय प्रत्येकासाठी तितकीच फायदेशीर आहे का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
रात्री झोपेत असताना शरीरातील मेटाबॉलिझम (Metabolism) मंदावलेला असतो. पोट रिकामे असते आणि तोंडात बॅक्टेरियांची वाढ झालेली असते. अशा परिस्थितीत सकाळी कोमट पाणी पिल्याचा परिणाम व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असतो. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी, गॅस, कमी रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्या आहेत की नाही, तसेच तुमची दैनंदिन जीवनशैली कशी आहे, यावर याचे फायदे-तोटे ठरतात.
होलिस्टिक डाएटीशियन आणि इंटीग्रेटिव्ह थेरप्युटिक न्यूट्रिशनिस्ट डॉ. गीतिका चोप्रा यांच्या मते, सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणे ही एक चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे, विशेषतः हिवाळ्यात. रात्रीच्या झोपेमुळे शरीर काहीसे डिहायड्रेट होते आणि पचनसंस्था सुस्त अवस्थेत असते. अशावेळी कोमट पाणी पिल्याने आतड्यांची हालचाल सक्रिय होते, मलविसर्जन सुलभ होते आणि बद्धकोष्ठता, पोट फुगणे, जडपणा यांसारख्या समस्या कमी होतात.
तज्ज्ञ सांगतात की कोमट पाणी बॉवेल मूव्हमेंटला चालना देते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम हळुवारपणे सुरू होतो. मात्र अतिशय गरम पाणी पिणे टाळावे. कारण जास्त गरम पाण्यामुळे अॅसिडिटी वाढू शकते, घशाला इजा होऊ शकते, तोंड कोरडे पडते आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
एकूणच, सकाळी कोमट पाणी पिण्याचे काही फायदे नक्कीच आहेत. मात्र केवळ यामुळे फॅट बर्निंग किंवा डिटॉक्स होते, असे मानणे चुकीचे आहे. कोमट पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि पचनसंस्थेला नैसर्गिकरित्या आधार देते, एवढेच त्याचे खरे महत्त्व आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराची गरज ओळखून आणि मर्यादेत राहून ही सवय अंगीकारणे अधिक योग्य ठरते.




