‘फूड कोमा’पासून मुक्त राहण्यासाठी आहार, सवयी आणि झोपेकडे द्या विशेष लक्ष
दुपारचे जेवण झाल्यानंतर अचानक येणारा थकवा आणि झोप अनेकांना अनुभवायला मिळते. यालाच ‘फूड कोमा’ असे म्हटले जाते. ऑफिसमध्ये असताना अशी झोप येऊ लागली, तर कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. मात्र, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास दुपारनंतरही शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने ठेवता येऊ शकते.
दुपारी नेमकं काय खातो, याचा थेट परिणाम आपल्या ऊर्जेवर होतो. जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाल्ल्यास झोप येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दुपारच्या जेवणात संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास ऊर्जा टिकून राहते. जेवणानंतर गुळाचा छोटा खडा खाणेही उपयोगी ठरू शकते. ऑफिसमध्ये असाल, तर शक्यतो हलके आणि पचायला सोपे जेवण निवडा.
जेवताना घाई न करता हळूहळू चावून खाण्याची सवय लावा. पोटभर न खाता योग्य प्रमाणात जेवण केल्यास आळस येत नाही. फळे, चणे किंवा हलके स्नॅक्स जेवणात समाविष्ट केल्यास पोट भरलेलं राहते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.
दुपारच्या जेवणानंतर थोडं चालणं नेहमीच फायदेशीर ठरतं. ऑफिसमध्ये शक्य असल्यास पाच ते दहा मिनिटांचा छोटासा वॉक घ्या. उन्हात चालल्याने शरीरातील स्नायू सक्रिय होतात आणि ताजेतवाने वाटतं. यामुळे व्हिटॅमिन डी मिळण्यासही मदत होते, ज्यामुळे थकवा कमी होतो.
दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे. रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्यास शरीर हायड्रेट राहतं, पचन सुधारतं आणि थकवा कमी जाणवतो. विशेषतः काम करणाऱ्या महिलांसाठी ही सवय फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेलं लिंबूपाणी त्वचेसाठीही चांगलं मानलं जातं.
कधी कधी दुपारचा थकवा हा अपुरी झोप यामुळेही येतो. त्यामुळे झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष करू नका. दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेतल्यास शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. थोडे बदल आणि योग्य सवयी केल्यास दुपारनंतरचा आळस दूर ठेवता येतो आणि संपूर्ण दिवस उत्साहात घालवता येऊ शकतो.




