अति कॅफीनमुळे वाढू शकतात हृदय, झोप आणि पचनासंबंधी समस्या.
चहा हा अनेकांच्या दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळी उठल्यावर, कामाच्या वेळेत किंवा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारताना चहाचा कप हातात असलाच पाहिजे, अशी अनेकांची सवय असते. दिवसातून दोन-तीन वेळा चहा घेणे सामान्य आहे, पण हेच प्रमाण जर चार-पाच कपांपर्यंत पोहोचले, तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मर्यादित प्रमाणात घेतलेला चहा शरीराला ताजेतवाने ठेवतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स थकवा कमी करण्यास मदत करतात. मात्र, चहामधील कॅफीनचे प्रमाण लक्षात घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, दिवसाला २०० ते ३०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त कॅफीन शरीरात जाणे टाळावे. जर तुम्ही दिवसाला पाच-सहा कप चहा घेत असाल, तर कॅफीनची पातळी वाढण्याची शक्यता असते.
अति कॅफीनमुळे हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता, झोप न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अॅसिडिटी, पोटदुखी, जळजळ आणि पचन बिघडण्याचा त्रासही होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये जास्त चहा घेतल्यामुळे शरीरातील लोहशोषण कमी होऊन अॅनिमियाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, चहा पिताना त्याचे प्रमाण आणि वेळ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले राखायचे असेल, तर चहाचा आस्वाद घ्या पण मर्यादेतच!




