दररोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी वेलची केवळ चव वाढवत नाही, तर पचन, श्वसन, रक्तदाब आणि मानसिक आरोग्यासाठीही खास उपयोगी
भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना विशेष मान आहे. त्यातलीच हिरवी वेलची घराघरात वापरला जाणारा सुगंधी मसाला. पण तिचा सुगंध आणि चव एवढ्यापुरतीच मर्यादा नाही. प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की, फक्त 15 दिवस रोज 2 वेलची खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल जाणवतात.
श्वास आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
वेलचीच्या तेलात बॅक्टेरियावर नियंत्रण ठेवणारे गुण असतात. त्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर राहते आणि श्वास ताजा वाटतो. याच कारणामुळे जुने राजे-महाराजे जेवणानंतर वेलची खात असत.
सर्दी-खोकल्यात दिलासा
आजकाल सर्वसामान्य समस्या बनलेली सर्दी आणि खोकला वेलचीमुळे कमी होऊ शकतो. तिचा उष्ण स्वभाव श्लेष्मा सैल करतो आणि छातीतील कफ कमी करतो, ज्यामुळे श्वासोच्छ्वास सुरळीत होते.
पचनक्रिया सुधारते, गॅस, सूज, जडपणा या तक्रारी कमी होतात. जेवण पटकन पचायला मदत होते.
हृदयासाठीही फायदेशीर
वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जादा मीठ आणि पाणी बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो. संशोधनानुसार सौम्य उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ती उपयोगी ठरते.
वेलची कशी सेवन करावी?
दररोज 2 वेलची चावून खा
वेलची पावडर + मध + लिंबू + काळी मिरी मिसळून खोकला सिरप तयार करा
3–4 वेलची, दालचिनी/काळी मिरी घालून हर्बल टी बनवा
दुधात वेलची घालून घेतल्यास झोप उत्तम लागते
मानसिक शांतता आणि रोगप्रतिकारशक्ती
वेलचीचा सुगंध मन शांत ठेवतो, ताण कमी करतो आणि एकाग्रता वाढवतो. तिच्यातील नैसर्गिक घटक सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देतात. तोंडातील जंतू नष्ट होऊन दात-हिरड्यांचे आरोग्य सुधारते. एकूणात वेलची हा छोटासा मसाला शरीर, मन आणि पचनासाठी एक नैसर्गिक औषधच आहे. पण नेहमी प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे.




