महागडी उत्पादने वापरूनही केस निर्जीव होत असतील, तर शॅम्पू लावताना तुम्ही करत असलेल्या ‘या’ सवयींकडे लक्ष द्या
केस सुंदर आणि चमकदार असावेत म्हणून आपण पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंट आणि ब्रँडेड शॅम्पूंवर हजारो रुपये खर्च करतो. मात्र, इतकी काळजी घेऊनही जर केस गळत असतील किंवा कोरडे पडत असतील, तर समस्या उत्पादनामध्ये नाही तर तुमच्या ‘शॅम्पू करण्याच्या पद्धतीत’ असू शकते. अनेकदा आपण घाईघाईत अंघोळ करताना शॅम्पू लावतो, पण चुकीच्या सवयींमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि केसांचे कायमस्वरूपी नुकसान होते.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांचा प्रकार न ओळखता कोणाचेही ऐकून शॅम्पू वापरणे. तेलकट आणि कोरड्या केसांसाठी वेगवेगळे घटक लागतात; चुकीच्या निवडीमुळे टाळूचे आरोग्य बिघडते. तसेच, बाजारात मिळणारे बहुतांश शॅम्पू भयंकर रसायनांनी (Chemicals) भरलेले असतात. शॅम्पू घेताना त्यातील घटक वाचण्याची सवय लावा आणि जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांकडे वळा. लक्षात ठेवा, जास्त फेस होणे म्हणजे केस जास्त स्वच्छ होणे असा मुळीच अर्थ होत नाही. उलट, जास्त शॅम्पू वापरल्याने केसांमधील नैसर्गिक पोषण आणि तेल संपून जाते, ज्यामुळे केस झाडू सारखे कोरडे दिसू लागतात.
शॅम्पू करताना अनेकजण फक्त केसांच्या लांबीवर लक्ष देतात, पण खरी घाण, घाम आणि कोंडा हा टाळूवर (Scalp) साचलेला असतो. त्यामुळे बोटांच्या शेंड्यांनी टाळूला हलक्या हाताने मसाज करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची आणि टाळली जाणारी चूक म्हणजे कंडिशनरचा अभाव. शॅम्पूमुळे केसांची छिद्रे उघडतात, ती सुरक्षितरीत्या बंद करण्यासाठी आणि केसांना संरक्षक कवच देण्यासाठी कंडिशनर लावणे अनिवार्य आहे. जर तुम्ही शॅम्पूनंतर कंडिशनर लावत नसाल, तर तुमची ‘हेअर केअर’ अपूर्ण आहे. या छोट्या पण प्रभावी बदलांमुळे तुमचे केस पुन्हा एकदा सळसळते आणि निरोगी होऊ शकतात.




