spot_img

Gulabrao Patil : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत गुलाबराव पाटलांची जळगावात जोरदार फटकेबाजी

spot_img

“निवडून आल्यानंतर सर्वांचे व्हा” – धरणगावच्या सभेत विरोधकांबाबत संयमाचा सल्ला

महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सर्व पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झालेल्या प्रचारसभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

विरोधकांवर टीका करण्यापेक्षा संयम बाळगण्याचा सल्ला देत गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना थेट संदेश दिला. “निवडून आलो म्हणजे आता आपण सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत. विरोधक आले तरी त्यांच्याशी सन्मानाने वागा,” असे सांगत त्यांनी लोकशाहीत निवडणूक संपल्यानंतर मतभेद संपले पाहिजेत, यावर भर दिला.

आगामी राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की आमदारकीच्या निवडणुका अजून दूर आहेत. सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तसेच मागील अनुभवांचा दाखला देत त्यांनी सूचक वक्तव्य केलं की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती होण्याची शक्यता कमी आहे.

आपल्या मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांवर भाष्य करत गुलाबराव पाटील यांनी मिश्कीलपणे सांगितले की सत्तेत असताना शब्द जपून वापरावे लागतात. “मला सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागतं,” असे म्हणत त्यांनी वातावरण हलकंफुलकं केलं. मात्र, आमदार किशोर पाटील मोकळेपणाने भूमिका मांडत असल्याचं सांगत त्यांनी त्यांचं कौतुकही केलं.

धरणगावच्या राजकारणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, गेली काही वर्षे सत्ता हातातून गेली असली तरी ती पुन्हा मिळवण्याचा आत्मविश्वास आपल्यात आहे. निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांचा बदलणारा स्वभाव यावर त्यांनी टीका केली आणि कार्यकर्त्यांशी गोड बोलण्याचं आवाहन केलं.

आपल्या जुन्या संघर्षांच्या आठवणी सांगताना त्यांनी १९९६ सालचा किस्सा सांगितला. त्या काळात परिस्थिती कठीण असतानाही प्रयत्नांची पराकाष्ठा करून धरणगावचा नगराध्यक्ष बसवण्यात यश मिळालं होतं, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्षाची आठवण करून दिली. प्रचारसभेतून गुलाबराव पाटील यांनी अनुभव, टोले आणि संदेश यांचा समतोल साधत उपस्थितांना संबोधित केलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ