मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात गुढी पाडव्याच्या शोभा यात्रेदरम्यान एक वेगळीच घटना घडली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. पारंपरिक वेशात सहभागी झालेली एक तरुणी सुपरबाईकवर बसून वारंवार इंजिन ‘रेव्ह’ करत होती. तिच्या बाईकच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज आसपासच्या लोकांसाठी त्रासदायक ठरत होता.
गर्दीची पर्वा न करता सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिस्थिती बिघडण्याआधीच कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी त्या तरुणीला सर्वांसमोरच सुनावलं आणि तिच्या वागणुकीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. नऊवारी साडीमध्ये पारंपरिक लूकमध्ये असलेल्या या तरुणीने स्टाइल दाखवण्याच्या नादात केलेली ही कृती उलट तिच्याच विरोधात गेली. पोलिसांच्या समज दिल्यानंतर तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ती लगेचच बाईकवरून खाली उतरली.दरम्यान, संबंधित बाईक मालकाला विचारणा करण्याचा प्रयत्नही झाला, पण काही तरुणांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही वेळातच वातावरण शांत झाले.
या घटनेतून सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागण्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.




